वाहतूककोंडी कायमची सुटेल अशी कामे करा; एकनाथ शिंदेंनी घोडबंदर मार्गाबाबत दिली सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:14 IST2025-08-09T10:10:22+5:302025-08-09T10:14:17+5:30
रस्त्याच्या कामासाठी ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.

वाहतूककोंडी कायमची सुटेल अशी कामे करा; एकनाथ शिंदेंनी घोडबंदर मार्गाबाबत दिली सूचना
मीरा रोड : घोडबंदर मार्गावरील काजूपाडा खिंडीतील रस्त्याचे डांबरीकरणचे काम मीरा-भाईंदर महापालिकेने सुरू केले आहे. या कामाची पाहणी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी करून आढावा घेतला. रस्त्याचे काम टिकाऊ करा, जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील घाटात खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायमची सुटेल व नागरिकांना दिलासा मिळेल, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. रस्त्याच्या कामासाठी ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.
दाेनदा दुरुस्ती करूनही रस्त्याची दुरवस्था
गेल्या वर्षभरात घोडबंदर मार्गावरील काजूपाडा खिंड परिसरातील रस्ता हा दोन वेळा दुरुस्त करूनदेखील टिकलेला नाही. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे.
घाट भागामध्ये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम मीरा-भाईंदर महापालिकेने हाती घेतले आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उपअभियंता यतीन जाधव, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे आदी उपस्थित होते.
असे होणार मजबुतीकरणाचे काम
काजूपाडा खिंडीतील सुमारे ४५० मीटर लांबी व नऊ मीटर रुंदीचा घाटरस्ता
१० इंचपर्यंतचे जुने डांबर काढून व खडीकरण आणि ग्राऊंटिंग
५० एमएमचा डीबीएम लेयर
४० एमएमचा मास्टिक एसफाल्टचा वापर
०९ मीटर रुंद मशीन
बंगळुरूवरून आणले