डहाणूचा रँचो! मोबाईलवरुन पशुधन पर्यवेक्षिका पत्नीचं मार्गदर्शन घेत गाईची प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:35 IST2019-11-16T23:31:53+5:302019-11-17T06:35:09+5:30
पत्नीकडून मोबाइलवरून मार्गदर्शन घेऊन गायीची सुखरूप सुटका करणारा शिक्षक तालुक्यात चर्चेचा विषय

डहाणूचा रँचो! मोबाईलवरुन पशुधन पर्यवेक्षिका पत्नीचं मार्गदर्शन घेत गाईची प्रसूती
डहाणू/बोर्डी : रस्त्याच्याकडेला असह्य प्रसूतीवेदनेने विव्हळणाऱ्या गायीची अवस्था पाहून नांदेडला असणाऱ्या पशुधन पर्यवेक्षिका पत्नीकडून मोबाइलवरून मार्गदर्शन घेऊन गायीची सुखरूप सुटका करणारा शिक्षक तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. आमीर खान यांच्या बहुचर्चित ‘थ्री इडियट’ चित्रपटातील या घटनेशी साम्य असलेला हा थरार शनिवारी डहाणू फोर्ट येथील मारु ती मंदिराजवळ सकाळी सातच्या सुमारास घडला.
डहाणू फोर्ट येथील समाजसेविका उज्वला डामसे आणि लावण्या शेट्टी या शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. येथील मारुती मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला एक गाय प्रसूती वेदनेने विव्हळत असताना भटकी कुत्री तिला त्रास देत होती. त्यांच्या तावडीतून तिची सुटका करणाऱ्या त्या दोघींना पाहून जयवंत गंधकवाड हे जिल्हा परिषद रायतळी, गडगपाडा शाळेतील शिक्षक शाळेकडे जाताना थांबले. गुंतागुंतीच्या प्रसूतीवेदनेने मरणयातना सोसणाºया गायीला मदत करण्याचा विचार त्यांनी केला. याकरिता डहाणूतील त्यांच्या संपर्कातील पशुवैद्यकांशी मोबाइलवरून संंपर्क साधल्यानंतर, मदत मिळण्यास अपयश आले. याकरिता नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे पशुधन पर्यवेक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी मीना उटलवाड यांच्याशी संपर्ककरून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन गाईची प्रसूती सुरू झाली. मात्र वासराचे डोके आत मध्येच राहिल्याने शरीराबाहेर येण्यास अडथळा येत होता. अवधी उलटूनही यश न येता गायीची परिस्थिती बिकट होत असल्याने उपस्थितांची घालमेल वाढत होती. काहीही झाले तरी मागे न हटता सूचनांनुसार सुरू ठेवलेल्या शर्थीच्या प्रयत्ननांना यश आले. डोके आणि पाय दिसू लागताच शिक्षकांनी वासरू बाहेर ओढत गायीची सुखरूप सुटका केली.
गायीच्या विण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. सकाळची वेळ असल्याने स्थानिक पातळीवरून मदत न मिळाल्याने पशुधन पर्यवेक्षिका असलेल्या पत्नीशी संपर्क साधला. त्यांनी आणि डॉ. कोठेकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे हे कार्य सुरळीत पार पडले, त्याचे समाधान आहे.
- जयवंत गंधकवाड, शिक्षक