coronavirus : पादचाऱ्यांना भरधाव टेम्पोने उडवले, चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 12:19 IST2020-03-28T11:03:56+5:302020-03-28T12:19:01+5:30
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक मजूर आपल्या गावाच्या दिशेने पलायन करू लागले आहेत.

coronavirus : पादचाऱ्यांना भरधाव टेम्पोने उडवले, चार जणांचा मृत्यू
विरार - जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक मजूर आपल्या गावाच्या दिशेने पलायन करू लागले आहेत. मात्र जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने अनेक जण पायपीट करत आहेत. दरम्यान, पायपीट करत निघालेल्या काही जणांना भरधाव टेम्पोने उडवल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळ झाला.
लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी साधने बंद करण्यात आली आहेत. तसेच जिथे असाल तिथे राहा असे आवाहन लोकांना करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोक चालत गावाच्या दिशेने निघाले आहेत. विरारमध्ये या मजुरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवले. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली.
या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचे नाव कल्पेश जोशी (32) तर दुसऱ्याचे नाव मयांक भट (34) असे आहे.