coronavirus: लाॅकडाऊनच्या शक्यतेने मच्छीमारांची वाढली चिंता, मत्स्यटंचाईचेही संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 02:42 AM2021-04-03T02:42:20+5:302021-04-03T02:43:01+5:30

हाेळी सणानिमित्त १५ मार्चपासून होळी सणानिमित्ताने बंद असलेली मासेमारी १० एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यल्प मासे मिळत असल्याने मत्स्यटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

coronavirus: Fishermen worried over possible lockdown | coronavirus: लाॅकडाऊनच्या शक्यतेने मच्छीमारांची वाढली चिंता, मत्स्यटंचाईचेही संकट

coronavirus: लाॅकडाऊनच्या शक्यतेने मच्छीमारांची वाढली चिंता, मत्स्यटंचाईचेही संकट

Next

- हितेन नाईक 
पालघर : हाेळी सणानिमित्त १५ मार्चपासून होळी सणानिमित्ताने बंद असलेली मासेमारी १० एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यल्प मासे मिळत असल्याने मत्स्यटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. त्याचबराेबर, काेराेनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने लाॅकडाऊन झाल्यास मासेविक्रीलाही झळ बसणार आहे. त्यामुळे हाेळीनिमित्त घरी परतलेल्या खलाशांना पुन्हा बंदरात बाेलविण्यास बाेटमालक अनुत्सुक दिसत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी सध्या मासेमारी बंद ठेवण्याला पसंती दिल्याने किनाऱ्याला उभ्या असलेल्या बाेटींची लांबलचक रांग नजरेस पडत आहे.
मागच्या वर्षी २१ मार्च २०२० पासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर झाला हाेता. तेव्हा मासळी मार्केट बंद केल्याने  स्थानिक मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला होता, तर दुसरीकडे सातपाटीसारख्या बंदरातून संस्थेमार्फत निर्यात करण्यात येणाऱ्या पापलेट माशाचा भावही व्यापाऱ्यांनी कमी केल्याने कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला होता. वर्षभर या संकटात सापडलेल्या मच्छीमारांचे आता डिझेलच्या भाववाढीने पुन्हा कंबरडे मोडले आहे. तरीही तग धरून समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांच्या बोटींना मासेच मिळत नसल्याने पालघर, डहाणू, वसई, उत्तन तालुक्यांतील हजारो बोटींनी ५ मार्चपासून मासेमारी व्यवसाय बंद करून आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या. मच्छीमारांसह आदिवासी समाजात होळीच्या सणाला मोठे महत्त्व असल्याने किनारपट्टीवरील सर्व बोटींमधील खलाशी कामगार आपल्या गावी परतल्याने १२ मार्चपासून सर्वच बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. होळी कालावधीत स्थानिक कामगारांच्या साथीने मासेमारीला गेलेल्या बोटींना अत्यल्प मासे मिळाल्याने एका ट्रिपचा एक ते सव्वालाखाचा खर्च फुकट गेल्याने किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या बोटी पुन्हा सुरू करण्याचे धाडस बोटमालक सध्या करू इच्छित नसल्याचे दिसून येत आहे.  

डिझेल दरवाढीने व्यावसायिकांचे माेडले कंबरडे 
nसमुद्रातील किनारपट्टीच्या जवळपास सापडणारे माशांचे थवे ओएनजीसी सर्वेक्षण, किनारपट्टीवर मालवाहू बोटीच्या हालचाली, प्रदूषण आदी कारणांमुळे दूरवर खोल समुद्रात निघून गेल्याने त्यांच्या शोधार्थ मच्छीमार बोटींना गुजरात, मुंबई, रत्नागिरी आदी भागांत जावे लागते. त्यामुळे पूर्वी सात दिवसांची असलेली ट्रिप आता १३ दिवसांची करण्यास बोटमालकांना भाग पडले आहे. १ एप्रिल २०२० रोजी ६५.२७ पैसे प्रतिलिटर असलेल्या डिझेलने  आता ८७.२२  रुपयांवर उडी घेतली आहे. 
nत्यामुळे बोटीला एका ट्रिपला ५०० ते ६०० लिटर डिझेल लागत असल्याचे हृषिकेश मेहेर या मच्छीमारांनी सांगितले. सुमारे ४८ हजारांचे डिझेल, तांडेल, खलाशी पगार, ३ टन बर्फ, ऑइल, जीवनावश्यक वस्तू आदीचा खर्च पाहता एका ट्रिपला बोटमालकाला एक ते सव्वालाखाचा खर्च येतो. या खर्चाच्या अनुषंगाने समुद्रात टाकलेल्या जाळ्यांना इतके मासे मिळत नसल्याने तोटा सहन करून हा व्यवसाय सुरू ठेवण्यापेक्षा बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याला बोटमालकांनी प्राधान्य दिले आहे.  

पगार, जेवण व इतर खर्च महाग 
एका बोटीत तांडेल प्रमुखाच्या हाताखाली १३ ते १५ खलाशी कामगार असतात. तांडलाचा आठ महिन्यांचा पॅकेज पाच ते सहा लाख इतका आहे. एका खलाशी कामगाराला १५ ते २५ हजार प्रतिमहिना पगार असतो. दाेन वेळचे जेवण, नाश्ता, उपचार, इन्शुरन्स आदी सर्व खर्च बोटमालकाला करावा लागत असल्याने हा व्यवसाय खूपच खर्चिक झाला आहे.  

बँकेकडून बोटमालकांनी घेतलेले कर्ज फेडण्याइतकेही मासे मिळत नाही. मात्र मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या तेवढीच आहे. शासनाने या व्यवसायाकडे गंभीरपणे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
-  जगदीश नाईक, चेअरमन, मच्छीमार सहकारी संस्था, सातपाटी   

समुद्रातील मासेमारी व्यवसायातील बदलत्या स्वरूपाचा मोठा फटका मच्छीमारांना आता बसू लागला आहे. मासेमारीसाठी खर्च वाढत असताना पकडून आणलेल्या माशांना योग्य भाव मिळत नसल्याने मच्छीमारांची दुहेरी कोंडी होत आहे.
- संजय तरे, मच्छीमार 


 

Web Title: coronavirus: Fishermen worried over possible lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.