पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:48 PM2021-03-27T23:48:32+5:302021-03-27T23:48:43+5:30

कमाल तापमान राहणार सरासरीपेक्षा जास्त : शेतकऱ्यांनी स्वतःसह पशुधनाची काळजी घेण्याची गरज, कृषी हवामान शास्त्रज्ञांचा सल्ला

Citizens in Palghar district will be harassed by Ukada for the next four weeks | पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

पालघर जिल्ह्यामधील नागरिक पुढील चार आठवडे उकाड्यामुळे होणार हैराण

Next

अनिरुद्ध पाटील  

बोर्डी : भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील चार आठवडे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. त्यामुळे उष्णता अधिक वाढणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली. दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी तापमान ३७.२ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले.

तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी केले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळबागांना गरजेनुसार नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी, पाणी शक्यतो संध्याकाळी द्यावे. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशापासून आंब्याच्या बुंध्याचे संरक्षण करण्यासाठी खोडावर बोर्डोपेस्ट लावावी तसेच झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे, जेणेकरून बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. नवीन लागवड केलेल्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपई यांसारख्या फळांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी बॅगिंग किंवा स्कर्टिंग करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता त्यांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी त्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. कुक्कुटपालन शेडच्या बाजूने बारदाने लावून त्यावर सतत पाणी शिंपडावे तसेच छतावर गवत पसरावे.  त्यामुळे आतील तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाचा कडाका वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Citizens in Palghar district will be harassed by Ukada for the next four weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.