बोईसर : देशाच्या महत्त्वाच्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) या दोन्ही प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) कॉन्स्टेबल ३० जिवंत काडतुसे व एक पिस्तूल घेऊन फरार झाला आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला मनोज यादव हा सीआयएसएफमध्ये १२ वर्षांपासून कॉन्स्टेबल, तर मागील दोन महिन्यांपासून तारापूर येथील सीआयएसएफच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कार्यरत आहे. गुरुवारी त्याची रात्रपाळी होती, मात्र तो दुपारी एकच्या सुमारास सीआयएसएफच्या तारापूर विभागाच्या शस्त्रागारात जाऊन मला दुसऱ्या पाळीत ड्युटीवर जॉइन व्हायचे आहे, असे खोटे सांगून ३० जिवंत काडतुसे व पिस्तूल दुपारी साडेबाराच्या सुमारास ताब्यात घेऊन बाहेर पडला. त्याने थेट बोईसर रेल्वेस्थानक गाठल्याची माहिती समोर येत आहे.वास्तविक कॉन्स्टेबल यादव याची ड्युटी रात्री ९ ते पहाटे ५ अशी रात्रपाळीत होती. परंतु, त्याने सेकंड शिफ्ट सांगून ही हत्यारे घेतली होती. रात्री ९ वाजता सेकंड शिफ्टची वेळ संपूनही यादव हत्यार जमा करण्यास न आल्याने रात्री ११ वाजता विनापरवानगी शासकीय हत्यार घेऊन गेल्याची तक्रार सीआयएसएफच्या पोलीस निरीक्षकांनी तारापूर पोलीस ठाण्यात दिली.
सीआयएसएफचा जवान पिस्तुलासह फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 09:03 IST