जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 06:32 PM2024-01-13T18:32:29+5:302024-01-13T18:32:56+5:30

राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे.

Chief Minister Eknath Shinde said, will create a developed Maharashtra that will be the envy of the world | जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

(मंगेश कराळे)

नालासोपारा: राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे. जगाला हेवा वाटावा  असा विकसित महाराष्ट्र घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरारच्या विवा महाविद्यालय येथे १९ वे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसई - विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार, संमेलनाचे अध्यक्ष व जपानमधील मराठी आमदार योगेंद्र पुराणिक, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला असेल तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते  याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान मधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत. काळा बरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये समाविष्ट झाला शेकडो वर्षापासून मराठी भाषेची मूळे सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत हे सर्वांना अभिमानाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवडी - नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरण पूरक प्रकल्प असून तो वरळी, कोस्टल हायवे, मुंबई - पुणे एक्सप्रेस वे, मुंबई गोवा हायवे, तसेच वसई -विरार- अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई -पुणे मिस्सिंग लिंक हा जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. या बोगद्यामुळे पुण्याचे अंतर हे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही संत, साहित्यिक ,कविवर्य, कलाकारांची भूमी असून या सर्व महान व्यक्तींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून जगभर मराठी भाषेचा प्रसार होतांना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते या संमेलनाला जगभरातील मराठी बंधू-भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन, वाशी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे. गिरगाव चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde said, will create a developed Maharashtra that will be the envy of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.