तारापूरमध्ये रसायनाची गळती; डोळे, घशाला त्रास झाल्याने कारखान्यातील ११ कामगार रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:26 IST2025-05-19T15:25:52+5:302025-05-19T15:26:29+5:30
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील प्लाट क्रमांक ४ मधून प्लाट क्रमांक १० मध्ये डीएमएस या रसायनाचे हस्तांतरण केले जात असताना ही दुर्घटना घडली.

तारापूरमध्ये रसायनाची गळती; डोळे, घशाला त्रास झाल्याने कारखान्यातील ११ कामगार रुग्णालयात
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक डी २/३ मधील कॅम्लिन फाईन सायन्सेस लिमिटेड या रसायन कारखान्यात रविवारी पहाटे ३ वाजता रासायनिक प्रक्रिया सुरू असताना डायमेथाइल सल्फेट (डीएमएस) या द्रव्याची गळती झाली. त्यातून निर्माण झालेल्या धुरामुळे दोन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत जळजळ होताच प्रथमोपचार करण्यात आले तर घरी गेल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने ११ कामगारांना बोईसरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील प्लाट क्रमांक ४ मधून प्लाट क्रमांक १० मध्ये डीएमएस या रसायनाचे हस्तांतरण केले जात असताना ही दुर्घटना घडली. रसायनाची गळती होऊन धूर निर्माण झाल्याने काही कामगारांच्या डोळ्यांत जळजळ सुरू झाली, तर काहींना घरी गेल्यानंतर डोळे आणि घशात त्रास जाणवू लागला. कारखाना व्यवस्थापनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेची माहिती कारखाना व्यवस्थापनाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही दिली.
कारखान्याचे म्हणणे...
हा गॅस गळतीचा प्रकार नाही, तर उत्पादन प्रक्रियेवेळी डीएमएस हे रसायन ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने वायू पसरला असावा. तत्काळ परिस्थितीची गंभीर दखल घेऊन त्याची माहिती सर्व संबंधित शासकीय विभागांना देण्यात आली, असे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले.
दुर्घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहायक संचालक एस. जी. सब्बन यांनी दुपारी दुर्घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली आहे.
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अशा दुघर्टनांची पुनरावृत्ती होणार नाही, याकरिता काटेकोरपणे खबरदारी घेतली जाईल.
धवल राऊत, कारखाना व्यवस्थापक
कारखाना व्यवस्थापनाकडून घटनेची माहिती मिळताच तत्काळ अधिकाऱ्यांना पाठवून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
नरेश देवराज, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय पालघर विभाग