पहिल्याच पावसात बुडाला वसई-विरार पालिकेचा दावा; अनेक भाग झाले जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST2020-07-04T00:36:54+5:302020-07-04T00:37:21+5:30
या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती

पहिल्याच पावसात बुडाला वसई-विरार पालिकेचा दावा; अनेक भाग झाले जलमय
विरार : वसई-विरार शहर पुढील वर्षी बुडणार नाही, असा दावा खुद्द बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर व वसई-विरार मनपाने गेल्या वर्षी केला होता, मात्र हा दावा पहिल्याच पावसात बुडाला आहे. शुक्रवारी दुपारी अर्धा तास पडलेल्या पावसात पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात पाणी तुंबल्याने वसई-विरार शहरासमोरील पावसाळ्यातील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.
कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी वसई-विरारमध्ये पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने विवा कॉलेज परिसरात पाणी साचले. मागील दोन वर्षीही शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही विवा कॉलेज परिसरात प्रचंड पाणी भरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना लहान बोटींद्वारे मदत पुरवावी लागली होती. या पूरस्थितीमुळे मनपा आणि बहुजन विकास आघाडीवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती.
या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती. यात निरी आणि आयआयटीकडून सुचवण्यात येणाºया उपाययोजनांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र निरी आणि आयआयटी यांच्यावर १२ कोटी खर्च करूनही या संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. यामुळे शहरे पुन्हा पाण्याखाली जाणार, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केली जात असतानाच, शुक्रवारी झालेल्या पावसाने ठाकूर आणि पालिकेचा दावा खोटा ठरवला.