विरारमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना घडला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:34 IST2025-09-22T19:33:42+5:302025-09-22T19:34:42+5:30
घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

विरारमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना घडला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या चंदनसार परिसरात टँकरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रताप नाईक (५५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते विरार येथील रहिवासी होते. घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने प्रताप नाईक हे देवीची मूर्ती आणण्यासाठी जात होते. रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक अडकल्याने ते दुचाकीसह खाली पडले. यावेळी मागून येणाऱ्या टँकरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातानंतर चंदनसार परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हा रस्ता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आता जीवघेणा ठरत आहे. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. काही संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करून घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. य प्रकरणी विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
अपघाताप्रकरणी टँकर चालक आनंदकुमार रामलाल यादव (२८) याला अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.