मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 14:25 IST2024-08-10T14:25:20+5:302024-08-10T14:25:56+5:30
मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता.

मनोरमध्ये भरधाव कारने बाइकस्वाराला चिरडले, कारचालकाने काढला पळ
पालघर / मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर हात नदी पुलावरील वळणावर गुरुवारी रात्री भरधाव वेगातील कारचालकाने दुचाकीला धडक दिल्यानंतर तडफडणाऱ्या तरुणाला उपचाराची गरज असताना आरोपी चालकाने पळ काढला. त्यामुळे उपचाराअभावी दुचाकीस्वार सागर गजानन पाटील (वय २८, रा. चांबळे, ता. वाडा) याचा मृत्यू झाला.
मनोरजवळील दुर्वेस गावच्या हद्दीतील हेरिटेज फूड प्रॉडक्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणारा सागर पाटील गुरुवारी रात्री ड्युटी संपवून साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून पालघरच्या दिशेने जात होता. हात नदी पुलालगतच्या वळणावर तो पोहोचला असता समोरून आलेल्या कारचालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने तो रस्त्याच्या कडेला फेकला. रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी कारमध्ये बसलेले सर्व पळून गेले.
नातेवाइक संतप्त
मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पोलिस गुन्हा दाखल करीत नसल्याने नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात येऊन जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाइकांनी या प्रकरणातील कारमालकाचा शोध घेत त्यातील चार तरुणांचा शोध लावला. त्यातील सचिन सुरवशे या तरुणाने आपण हा अपघात केल्याचे मान्य करीत गुन्हा कबूल केला. परंतु या प्रकरणात चालक दुसराच व्यक्ती असल्याने आणि त्याने मद्यपान केल्याने त्याला वाचविण्यासाठी सचिन पुढे येत आल्याचा संशय घेतला आहे. सीसीटीव्ही तपासात सचिन हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे.
सचिन सुरवशे हाच चालक असून, त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व तरुणांचे, गाडीमालकांची वैद्यकीय तपासणी केली आहे.
- सतीश शिवरकर, पोलिस निरीक्षक, मनोर.