पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:52 IST2025-08-06T11:52:01+5:302025-08-06T11:52:19+5:30
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला...

पोलिसांची वर्दी देण्यासाठी ‘अलार्म’; तर ‘केम छो’च्या बारबालांसाठी गुप्त पळवाट
मीरारोड : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मीरा रोड येथील केम छो या ऑर्केस्ट्रा बारवरील धाडीत पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी अलार्म आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोली व तेथून पळण्यासाठी वाट केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला. मेकअप रूमच्या मागील पार्टिशनलगत गुप्त दरवाजा शोधून पोलिसांनी चावीने दार उघडले असता मागे अरुंद बोळ दिसून आली. त्या ठिकाणी ११ बारबाला लपलेल्या आढळल्या. तेथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती. मात्र, पोलिसांनी बाहेरून नाकाबंदी केल्याने त्यांना पळून जाता आले नाही.
बारच्या प्रवेशद्वाराजवळ एक अलार्म बटन आढळून आले. पोलिस आले की बार कर्मचारी तो अलार्म बटन दाबायचा. त्यानंतर बारमधील दिवे सुरू होऊन आतील बारबालांना पळून जाण्याची सूचना दिली जात होती. या धाडीतही बाहेर पोलिस आल्याचे समजताच अलार्म बटन दाबून सूचित केले गेल्याने ११ बारबाला मागे लपून बसल्या होत्या.
रात्री बारमध्ये महिला - पुरुष मिळून ८ सिंगर ठेवायची परवानगी असताना १८ बारबाला सापडल्या. केम छो बार हा पालिका व पोलिसांनी अनधिकृत म्हणून जमीनदोस्त केला होता. पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. तरी न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगून त्याचे बांधकाम पुन्हा करून बार सुरू केला.
गाण्याचा गंध नाही, तरीही ‘सिंगर’
मीरारोड शहरात बहुतांश ऑर्केस्ट्रा बारची बांधकामे व अंतर्गत बदल हे बेकायदा आहेत. मात्र, महापालिकेसह पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. बारबालांना बारचालक - मालक हे ‘सिंगर’ म्हणून दाखवतात. प्रत्यक्षात त्यांना गाणे गाण्याचा गंधदेखील नसतो. रेकॉर्ड वाजवून गाणी वाजवली जाण्याचे प्रकार चर्चेत आहेत. बहुतांश ठिकाणी तर ऑर्केस्ट्रा बार व लॉज जोडून आहेत, जेणेकरून अनैतिक व्यवसाय करणे सोपे होते. ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून दरमहा हप्त्यांचे सिंडिकेट चालत असल्याचे आरोप, तक्रारी झाल्या आहेत.