सावत्र मुलीवर बलात्कार, पत्नीची हत्या; २१ वर्षांनंतर आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:48 IST2025-04-23T18:48:35+5:302025-04-23T18:48:35+5:30

आरोपी नाव बदलून तो धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता

Accused of raping stepdaughter killing wife arrested after 21 years | सावत्र मुलीवर बलात्कार, पत्नीची हत्या; २१ वर्षांनंतर आरोपीला अटक

सावत्र मुलीवर बलात्कार, पत्नीची हत्या; २१ वर्षांनंतर आरोपीला अटक

मंगेश कराळे

नालासोपारा:- सावत्र मुलीवर बलात्कार तसेच पत्नीची हत्या करून फरार झालेल्या एका आरोपीला २१ वर्षानंतर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अटक केली आहे. साजिद अली शेख उर्फ परवेज उर्फ  इडली असे या आरोपीचे नाव आहे. आपले नाव बदलून तो धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता. ही माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.

आरोपी साजिद अली शेख हा ट्रक चालक आहे. तो विरार मध्ये राहत होता. त्याने एका महिलेची लग्न केले होते. त्याला अठरा वर्षाची सावत्र मुलगी होती. साजिद या मुलीला धमकावून वेळोवेळी बलात्कार करत होता. या संबंधातून ती गर्भवती राहिली होती. अखेर कंटाळून मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने पतीला जाब विचारला.त्यावरून त्यांच्यात भांडण झाली होती. २० मे २००४ रोजी साजिद शेखने मारहाण करून पत्नीची हत्या केली आणि फरार झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्या तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला मात्र त्यांचा हाती काही लागले नाही.

पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी या गुन्ह्याचा नव्याने तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा २ च्या पथकाला दिले होते. मात्र त्यांच्याकडे २१ वर्षापूर्वीचा आरोपी शेख याचा फोटो होता. केवळ त्या फोटोवरून त्याचा माग काढण्याचे आव्हान पोलिसां पुढे होते. साजिद शेख हा ट्रक चालक असल्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढली. तो हैदराबाद आणि गुजरात येथे काही वर्ष वास्तव्यास होता. तेथे देखील पोलिसांनी जाऊन माहिती काढली. तो मुंबईच्या धारावी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.धारावी हा परिसर प्रचंड मोठा आणि झोपडपट्टीचा आहे. तेथून आरोपीला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.

पोलिसांनी धारावी परिसरात जाऊन माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी आरोपी शेख याच्यासारखा दिसणारा एक इसम परवेज पडली या नावाने वावरत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक निवडणूक सर्वेक्षण करणारे कर्मचारी बनले आणि परवेज उर्फ इडली याच्या घरात जाऊन माहिती काढली. परवेज उर्फ इडली वाला हाच साजिद शेख असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या तो ५५ वर्षांचा असून धारावी मध्ये टेम्पो चालक म्हणून काम करतो.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. फौजदार रमेश भोसले, संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदीश गोवारी, राजाराम काळे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकूर, राहुल कर्पे, अनिल साबळे, अजित मैड, प्रतिक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब अविनाश चौधरी यांनी केली आहे.

Web Title: Accused of raping stepdaughter killing wife arrested after 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.