महामार्गावरील हत्येप्रकरणी आरोपी तृतीय पंथीयाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:44 IST2024-09-21T18:42:32+5:302024-09-21T18:44:15+5:30
पैशांच्या वादातून ही हत्या एका तृतीयपंथीयाने केल्याचे उघड झाले आहे.

महामार्गावरील हत्येप्रकरणी आरोपी तृतीय पंथीयाला अटक
नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तृतीय पंथीय आरोपीला शुक्रवारी संध्याकाळी अटक केले आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने २४ तासांच्या आत जलद कामगिरी करत आरोपी गजाआड केला आहे. पैशांच्या वादातून ही हत्या एका तृतीयपंथीयाने केल्याचे उघड झाले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ असलेल्या सातिवली खिंडीत गुरूवारी दुपारी झुडपात एक अर्धनग्न अवस्थेत ३० ते ३५ वयोगटातील एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याची ओळख पटेल अशी एकही वस्तू घटनास्थळी नव्हती. मयताची ओळख पटविण्याचे त्याचबरोबर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी रुपा शेख नावाच्या तृतीयपंथीयाला या हत्या प्रकरणात अटक केली आहे. हत्या झालेल्याचे नाव महेंद्र कुमार दुबे असून तो चिंचोटी परिसरात राहत होता.
एका साडीमुळे मिळाला सुगावा
घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यावर एक साडी आणि वापरलेले काही कॉण्डम आढळले. रात्रीच्या वेळी तृतीयपंथीय या परिसरात असतात आणि मयत तृतियपंथीयाकडे आलेला ग्राहक असू शकतो असा कयास पोलिसांनी लावला. रात्रीपासून पोलिसांनी शहरातील सर्व तृतियपंथीयांच्या वस्त्या, अड्डे यावर धाडी घातल्या. रुपा शेख नावाची तृतीयपंथीय या परिसरात व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मात्र ती कबूल होत नव्हती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी मयताच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यात हत्या ४८ तासांपूर्वी झाल्याचे आढळून आले. ४८ तासांपूर्वी रुपा शेख कुठे होती त्याचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी काढले. त्यावेळी रुपा शेख त्याच सातिवली खिंडीत असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी आढळलेली साडी तिचीच असल्याचेही निष्पन्न झाले.
घटनास्थळावरील साडी, हत्येच्या वेळी आरोपी घटनास्थळी असल्याचा मिळालेला तांत्रिक पुरावा या आधारे रुपा शेख या तृतीयपंथियानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अटक केली आहे. - शाहूराज रणावरे, (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट २)