विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:34 IST2025-08-27T19:30:15+5:302025-08-27T19:34:57+5:30

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून  दुर्घटना घडली.

Accident rescue operation underway on war footing in Virar, District Collector reviews rescue operations | विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून  दुर्घटना घडली. घटनास्थळी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ  उद्ध्वस्त झाली असून, अनेक रहिवासी मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे. 

या अपार्टमेंटमध्ये एकूण ५० सदनिका आहेत. त्यापैकी अंदाजे १२ सदनिका कोसळल्या असून, मलब्याखाली १५ ते २० लोक अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांना दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. त्यानुसार वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व रात्रीपासूनच मदत व बचावकार्य सुरू केले.

बुधवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी  ५ जणांचा मृत्यू  झाला असून (३ जणांची ओळख पटली असून २ जणांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.  या दुर्घटनेत ९ जण जखमी आहेत. लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे) आणि उत्कर्षा जोवील (१ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.  जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४) यांचा समावेश असून, त्यांच्यावर वसई, नालासोपारा व विरार येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी ३ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ६ जणांवर उपचार सुरू आहेत.

बचावकार्य युद्धपातळीवर 

दुर्घटनेनंतर अंधेरी येथून एन.डी.आर.एफ.ची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. मलब्यात अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट शेजारील ४ मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रभावित नागरिकांसाठी समाज मंदिरात तात्पुरते निवारा शिबीर उभारण्यात आले असून, जेवणाची तसेच आवश्यक सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Accident rescue operation underway on war footing in Virar, District Collector reviews rescue operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.