तत्कालीन आयुक्त, उपसंचालक व मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:01 IST2025-11-27T18:00:40+5:302025-11-27T18:01:03+5:30
माजी नगरसेवक जमील शेख त्याचा सहाय्यक व अन्य शासकीय अधिकारी यांनी मिळून बोगस दस्तावेज बनवण्याचे उघडकीस आल्याने याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन आयुक्त, उपसंचालक व मनपा अधिकाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल
- मंगेश कराळे
नालासोपारा : वसईतील विविध शासकीय जमिनी लाटल्याची अनेक प्रकरणे घडलेली आहेत. यावेळी वसई पोलीस ठाण्याची जागा लाटून त्यातून खाजगी रस्ता बेकायदा बंगल्यासाठी बनवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात माजी नगरसेवक जमील शेख त्याचा सहाय्यक व अन्य शासकीय अधिकारी यांनी मिळून बोगस दस्तावेज बनवण्याचे उघडकीस आल्याने याबाबत वसई पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, सर्वे क्रमांक ९ या वसई पोलीस ठाण्याच्या जागेमध्ये बेकायदेशीर रस्ता बनवून सदर रस्ता कायदेशीर दिसण्यासाठी माहिती व दस्तावेज खरे वाटावे म्हणून बोगस दस्त बनवण्यात आले. सर्वे क्रमांक ११ अ व ब या जमीन मिळकतीत आरोपी जमील शेख याने बेकायदेशीर बंगला बनवला. पुरातत्व विभागाचे तसेच सीआरझेडचे सर्व नियम मोडून हे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे हा वादग्रस्त बंगला वसई तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. वसईतील राजकीय व्यक्तींचे आशीर्वाद असल्यामुळे या बंगल्यात अनेक दिग्गज उपस्थित राहायचे. सदर बंगल्यासाठी पोलिसांची जागा लाटण्यात आली होती. या कामी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच वसई विरार मनपाचे अधिकारी जमील शेख यांना गैर कायदेशीर प्रक्रियेत मदत करत होते. आरोपीला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची फसवणूक करून या प्रकरणात बनवलेली कागदपत्रे खरी वाटावीत म्हणून मदत केली. तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग पालिका प्रशासन व अन्य ठिकाणी हीच कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सिद्ध झाले.
आरोपी जमील अहमद शेख, छोटू बिस्मिल्ला शेख, तत्कालीन पालिका आयुक्त, तात्कालीन उपसंचालक, सन २०१६ ते १७ दरम्यानचे आय प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यावर बुधवारी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४५/२०२५ प्रमाणे फसवणूक व खोटे दस्तावेज केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे आत्ताच हा एफआयआर आलेला आहे. कुणालाही याप्रकरणी अटक केलेली नाही. याबाबत तपासाचे काम सुरू आहे.
- मिलिंद पाटील, (सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा)