२४ वर्षे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:03 IST2025-05-28T15:02:29+5:302025-05-28T15:03:05+5:30
Nalasopara Crime News: रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे.

२४ वर्षे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी
- मंगेश कराळे
नालासोपारा - रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे. आरोपीला पुढील तपास व चौकशीसाठी विरार पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी शिवकुमार गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे.
१४ ऑक्टोबर २००१ साली संध्याकाळच्या सुमारास आगाशीकडे जाणाऱ्या रोडलगत डॉ. कोळी यांच्या दवाखान्याच्या समोर अर्नाळा येथील शांतीनगर येथे राहणारे मोहरम अली (५६) यांच्या पोटात आरोपीने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये भर्ती केल्यावर त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोउनि एम.जी. खैरनार यांनी तपास करून फरार आरोपी हारून अली सय्यद यांच्याविरोधात सीआरपीसी २९९ प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी जुन्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मागील ५ महिन्यापासून अथक परिश्रम करुन या गुन्ह्यातील मयताचे नातेवाईक व इतर साक्षीदारांकडे फरार आरोपीबाबत सखोल चौकशी करत होते. आरोपीच्या यूपीच्या मुळ गावी व मुंबई परिसरात बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाद्वारे शोध घेऊन मुख्य फरार आरोपी हारुन अली सय्यद (४३) याला तलासरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर आरोपी हा त्यावेळी रिक्षा चालवायचा. त्याचे मोहरम अली सोबत रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यातून आरोपीने रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकूने वार केल्याचे सांगितले. अशा प्रकारे २४ वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनवणे आणि लखनऊ एसटीएफचे पोलीस निरीक्षक दिलीप तिवारी यांनी केली आहे.