यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:30 IST2018-07-15T22:28:31+5:302018-07-15T22:30:13+5:30
जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामुहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सामुहिक उपाययोजनाच गुलाबी बोंडअळीला अटकाव घालू शकतात, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी दिली.
मानकर पुढे म्हणाल्या, गत वर्षीच्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी उत्पादक शेतकरी मेळाकुटीस आला होता. कापूस उत्पादकांना त्यावेळी मोठा आर्थिक फटकाच सहन करावा लागला. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे २ लाख २६ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. एकट्या कृषी विभागाच्या प्रयत्नाने गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक कपाशी उत्पादक शेतकऱ्याने पुढे येत कृषी तज्ज्ञांकडून सुचविलेल्या योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गत दोन महिन्यांपासून गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून चित्र रथ व ठिकठिकाणी कार्यशाळा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फरदड कापूस घेऊ नये, पूर्व हंगामी लागवड करू नये, योग्य वाणाची निवड करावी, पिकांची फेरपालट करावी, दोनपेक्षा अधिक कीटकनाशके मिसळून फवारणी करू आदी विषयांवर या कार्यशाळेत तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिवाय सध्याही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. सोमवार १६ जुलैपासून विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कुठलीही अडचण असल्यास तात्काळ तालुका कृषी कार्यालयातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.
सोमवारपासून गावपातळीवर शिबिर
गुलाबी बोेंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कपाशी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गाव पातळीवर विशेष कार्यशाळा व शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अडचण आल्यास त्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्याना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल, असेही यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.