शिवमंदिरात दर्शनाला गेले, येतांना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर; एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:48 IST2026-02-17T16:47:31+5:302026-02-17T16:48:21+5:30
Wardha : हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथील सहा युवक रविवारी महाशिवरात्रीनिमित्त गावातील जुन्या वस्तीतील शिवमंदिरात दर्शनाला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला.

Went to visit Shiva temple, got tempted to swim in the river on the way; one person drowned and died
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट (वर्धा) : हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथील सहा युवक रविवारी महाशिवरात्रीनिमित्त गावातील जुन्या वस्तीतील शिवमंदिरात दर्शनाला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला. मात्र, त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास वणा नदीवरील आजंती धरण येथे घडली.
आकाश शेषराव बावणे (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. सहा युवक रविवारी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास गावातील जुन्या वस्तीमध्ये असलेल्या शिवमंदिरात शिवदर्शन घेण्याकरिता गेले होते. दर्शन झाल्यानंतर ते नवीन वस्तीत आपापल्या घरी परतले. काही वेळाने दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास आकाश आपला मित्र अथर्व गौरकर व आणखी चार युवकांसोबत आजंती डॅम येथे पोहायला गेले. नदीपात्रातून बाहेर निघताना आकाश बावणे चप्पल पायातून निसटल्याने तो पुन्हा पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांच्या डोळ्यांदेखत तो पाण्यात गायब झाला.
घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. भीमराव ठाकरे यांनी हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास अखेर आकाशचा मृतदेह हाती लागला. गावातील संतोष मन्ने यांनी आकाशचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
आज होणार अंत्यसंस्कार
- सोमवारी बोरगाव दातार येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
- ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
- मृत आकाशच्या मागे वडील, आई, लहान बहीण असा आप्त परिवार आहे.
- या घटनेत इतर पाच मित्र बचावले. मात्र, त्यांच्या डोळ्यांदेखत आकाशचा जीव गेल्याने त्यांना धक्का बसला आहे.