Wardha Crime News: सुभाष वैद्यने पत्नी माधुरी हरवल्याची पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला. तिच्या माहेरच्या लोकांशी चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सुभाष वेगवेगळी उत्तरं देतोय. पोलिसांनी त्याला चौकशीला बोलवण्यासाठी कॉल केला, पण सुभाषचा मोबाईल बंद... मग पोलीस थेट त्याच्या घरीच पोहोचले. तिथे सुभाष नव्हता; पण माधुरीसोबत काय झालं, याचा उलगडा झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात ही घटना घडली आहे. सुभाष वैद्य असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी माधुरी वैद्य हिची हत्या केली आणि मृतदेह घराशेजारी असलेल्या एका खड्ड्यात पुरला. पोलीस सध्या सुभाषचाच शोध घेत आहेत.
घटस्फोटित माधुरीला फसवले अन् लग्न केले
हिंगणगाटमधील इंदिरा गांधी वॉर्डात ही घटना घडली. शुक्रवारी हत्येची ही घटना उघडकीस आली. मृत माधुरी ही घटस्फोटीत होती. सुभाष वैद्य याने तिला फसवून तिच्याशी विवाह केला होता. मागील दोन दिवसापासून माधुरीच्या माहेरचे लोक फोन करीत होते. मात्र, आरोपी टाळाटाळीचे उत्तरे देत होता.
माधुरीची हत्या करून सुभाषने पोलिसांत दिली बेपत्ता झाल्याची तक्रार
दरम्यान, सुभाष वैद्य याने आधीच माधुरीची हत्या केली. त्यानंतर आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा फोन बंद येऊ लागला.
पोलिसांनी हिंगणघाट येथील त्याच्या घरी धाड टाकली. तो घरी नव्हता. पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. घराच्या परिसरात दुर्गधी येत असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.
त्याचवेळी पोलिसांना घराभोवती नाफ्थलीनच्या गोळ्या टाकलेल्या दिसल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी आजूबाजूला पाहणी केली. तेव्हा घराशेजारी माती ताजी खणलेली असल्याचे दिसले. त्यानंतर माधुरीची हत्या करून याच खड्ड्यात पुरल्याचे समोर आले. सध्या आरोपी सुभाष वैद्य फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.