Wardha: चीन, थायलंडमध्ये ‘खवल्या मांजर’ची मागणी मोठी, सहा तस्करांना तीन दिवसांची वनकोठडी
By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2025 21:32 IST2025-02-28T21:32:34+5:302025-02-28T21:32:53+5:30
Wardha News: पुलगाव येथील कॉटन मिल परिसरात एका कारमध्ये सहा तस्करांना खवल्या मांजरसह अटक केली. त्या खवल्या मांजरीचा दोन कोटींत सौदा होणार होता.

Wardha: चीन, थायलंडमध्ये ‘खवल्या मांजर’ची मागणी मोठी, सहा तस्करांना तीन दिवसांची वनकोठडी
- चैतन्य जोशी
वर्धा - पुलगाव येथील कॉटन मिल परिसरात एका कारमध्ये सहा तस्करांना खवल्या मांजरसह अटक केली. त्या खवल्या मांजरीचा दोन कोटींत सौदा होणार होता. विशेष म्हणजे या मांजरीची चायना अन् थायलंड देशात मोठ्या रकमेत खरेदी-विक्री होत असून, या कारवाईमुळे मोठ्या ‘रॅकेट’चा पर्दाफाश होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडेकर यांनी दिली. विशेष म्हणजे या सहाही तस्करांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असून, तिलाही लवकरच अटक केली जाणार आहे.
नफीत उल रहमान, रा. अमरावती, पचराज फेतराज पवार, रा. आगरगाव, मोहम्मद अनिस रा. अमरावती, गुरुबच्चनसिंग सागरसिंग बावरी, रा. पुलगाव, संकेत पंकज चव्हाण, रा. आगरगाव, अहमद खाँ अशरफ खाँ, रा. आकोली अशी अटक तस्करांची नावे आहेत.
...................................
अंधश्रद्धेतून गुप्तधन शोधण्याचा प्रकार
खवल्या मांजरचा वापर मांत्रिक, तसेच काही कथित बाबांकडून केला जातो. अंधश्रद्धेतून गुप्तधन शोधण्यासाठी या वन्यजिवाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच कारणातून पुलगावात पकडलेल्या तस्करांचा दोन कोटी रुपयांत होणारा सौदा उधळून लावला.
......................
मुंबईतील चार जणांची चमू दाखल
मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्राेल ब्यूरोकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाकडून तीन दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. मुंबई येथील चार अधिकाऱ्यांची चमूही पुलगावात दाखल होती. अखेर २७ रोजी सापळा रचून तस्करांना अटक केली.
....................
महिलांच्या तस्करीचाही संशय ?
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करांच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात महिला व तरुणींचे फोटोग्राफही मिळून आले. अटक असलेल्या तस्करांनी यापूर्वीही खवल्या मांजरचा सौदा केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे महिला व मुलींची तस्करी करणारे रॅकेट असल्याचा संशय असून, त्या दृष्टीने तपास केला जातो आहे.
...................
मोठे ‘रॅकेट’ लवकरच उघड
आरोपींच्या मोबाइलमध्ये अनेकांची नावे मिळाली आहेत, तसेच तरुणी, महिलांचेही फोटो आढळले आहेत. आरोपींनीही अनेकांची नावे सांगितली आहेत. त्यामुळे त्यांचा याच्याशी काय संबंध हे देखील तपासले जात आहे. लवकरच मोठे ‘रॅकेट’ उघड होण्याची शक्यता असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडेकर यांनी सांगितले.
...................
उच्चस्तरीय चौकशीची गरज
गुप्तधन शोधून देण्याचा दावा करून त्यासाठी लाखो रुपयांपर्यंत किंमत सांगून कासव, खवलेमांजर, मांडूळ साप, घुबड आदी प्राण्यांच्या कातडी, हाड विकत घ्यायला लावणारी टोळी सक्रिय आहे. खवले मांजर गुप्तधनाचा संकेत देतेय, असे सांगून दावा करणारे मांत्रिक त्याजागी खोदायला लावते. खवले मांजर गुप्तधन शोधून देत नाही. खोटे व्हिडीओ व माहिती देऊन हा प्राणी लाखो रुपयांत विकल्या जातो. याप्रकरणाची वन विभागाने उच्चस्तरीय चौकशी करावी.
-पंकज वंजारे, महाराष्ट्र राज्य युवा संघटक, अ.भा. अंनिस.