लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगरपालिकेचे कर्मचारी व सफाई कर्मचारी सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता आणि अन्य मागण्यांसंदर्भात २ मार्चपासून संपावर गेले होते. यामुळे अनेक कामे प्रभावित झाल्याने अखेर शुक्रवारी पालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठक होऊन वाटाघाटीतून १० मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन शुक्रवारपासून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता २ मार्चपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. पण, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गुरुवारी अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत दहा मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. तसेच संप काळातील कालावधी हा किरकोळ रजेत समायोजित करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्यावतीने अध्यक्ष रमेश मोगरे, महासचिव चंदन महत्वाने, अध्यक्ष रवींद्र जगताप व प्रमुख संघटक दीपक रोडे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आता संप मिटला असून सर्व कर्मचारी नियमित कामावर रुजू होणार आहे.
मागण्यांसदर्भात घेतलेले निर्णय सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता ३० एप्रिल २०२२ पर्यंत, सेवानिवृत्तांची देयकापैकी १ कोटी ५० लाख रुपये ३१ मार्च तर उर्वरित रक्कम तीन महिन्यानंतर देण्याचे ठरले. सेवानिवृत्तांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची शिल्लक राहिलेली रक्कम ३१ मार्चपर्यंत देण्याचे ठरले.
१२ व २४ वर्षे झाल्यानंतर देण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनेची थकबाकीची रक्कम ३१ मार्चपर्यंत देणार. ज्येष्ठ लिपिकांची रिक्त पदे तत्काळ पदोन्नतीने, तर कनिष्ठ लिपिकांची पदे वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करून शैक्षणिक अर्हतेसाठी अर्ज मागवून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेकरिता पाठविणार.
आरोग्य विभागास प्रत्येक महिन्याला दोन तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे दिवस सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश व बूटबाबतची कारवाई ३१ मार्चपर्यंत करण्याबाबत भांडार विभागास सूचना दिल्या. सफाई कर्मचाऱ्यांना श्रमसाफल्य योजनेमधून तत्काळ घरे बांधून देण्यासंबंधी जागा निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली.
या समितीत बांधकाम अभियंता संदीप डोईफोडे, रचना सहायक शंतनू देवयीकर, आरोग्य विभागप्रमुख प्रवीण बोरकर, रमेश मोगरे, रवि माकरे, उमेश समुद्रे यांचा समावेश आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त तारखेला अडीच लाखांचा धनादेश देऊन उर्वरित रक्कम तीन महिन्यांत देण्याचे ठरले आहे.