कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:13 IST2019-05-16T22:12:42+5:302019-05-16T22:13:08+5:30
मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झालेत. बुधवारी १५ ला रात्री १० वाजता कारंजा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. अपघातात प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.): मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झालेत. बुधवारी १५ ला रात्री १० वाजता कारंजा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली.
अपघातात प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कारंजा येथील आरिएंटल टोलनाक्याचा अकाउंटंट विजय रामाराव (३५) हा नेहमीच्या सवयीप्रमाणे अतिमद्य प्राशन करून कोंढाळीकडून आपल्या स्वत:च्या चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.३२ वाय ३०३० ने कारंजाकडे भरधाव वेगाने येत असताना कारंजा येथील पेट्रोलपंपावरून दुचाकी क्र.एम.एच.४३ एबी ७११३ ने निघालेले प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) रा. कारंजा यांच्या गाडीला कारचालकाने मागाहून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दोघेही जागीच ठार झालेत. अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच कारंजा येथून पेट्रोलपंपाच्या दिशेने युवक निघाले. तोपर्यंत विजय रामाराव अपघातस्थळावरून गायब झाला. त्याने ओरीएंटल टोलनाक्यावर अपघातग्रस्त गाडी टाकून तेथून ओरीएंटल टोल नाक्याच्या मुख्य व्यवस्थापकांकडे असलेल्या एम.एच.३२ सी. ६२८२ गाडीने पोलीस ठाण्यात जातो, असे सांगून फरार झाला. अपघातानंतर कारंजामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परंतु, रामाराव फरार झाल्याने पुढील अनर्थ टळला. गुरुवारीही कारंजात तणाव कायम होता. अनुचित घटना घडू नये म्हणून रात्रीच वर्धा येथून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यामुळे कारंजा पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे स्वत: कारंजा येथे उपस्थित होते. ठाणेदार राजेंद्र शेटे रात्रीपासून विजय रामाराव याचा शोध घेत होते. मृतांच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.