डुक्कर व दुचाकीच्या धडकेने दोनजण ठार तर एकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 10:31 PM2023-03-24T22:31:48+5:302023-03-24T22:32:19+5:30

Wardha News दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. 

Two people were killed and one injured in a collision between a pig and a bike | डुक्कर व दुचाकीच्या धडकेने दोनजण ठार तर एकजण जखमी

डुक्कर व दुचाकीच्या धडकेने दोनजण ठार तर एकजण जखमी

googlenewsNext

वर्धाः दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.  भरधाव दुचाकीस्वाराने सायकलस्वारास जबर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तळेगाव ते आष्टी मार्गावर देवगाव शिवारात आज सकाळी दहा वाजेदरम्यान घडली.

सुधाकर रामभाऊ शेटे  (६५)  रा. तळेगाव (श्याम.पंत) असे मृताचे नाव आहे. सुधाकर हे सायकलने तळेगाव येथून देवगाव शिवारातील शेतात जात होते. यादरम्यान एमएच २७ बीएच ४३३७ क्रमांकाच्या दुचाकीने एक व्यक्ती आष्टीकडून तळेगावकडे येत होता. भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालवून सुधाकर यांच्या सायकलला जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप नाव कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, नितेश वाघमारे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत दोन मित्र दुचाकीने जात असताना अचानक रानडुकरांनी त्यांना जबर धडक दिली. या धडकेत दोघेही खाली कोसळले. एकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. ही घटना आजनसरा शिवारात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

एकनाथ भोंडे (३५) हा मृत झाला. तर  प्रवीण नासरे (३२) हा जखमी आहे. दोघेही आजनसरा येथील रहिवासी आहेत. प्रवीणचे आईवडील जवळच्याच बोपापूर या मूळ गावी राहत असल्याने त्यांना भेटण्याकरिता प्रवीणच्या एम.एच. ३४ बी.एम. ०३५२ क्रमांकाच्या दुचाकीने दोघेही बोपापूरला गेले होते. आईवडिलांची भेट घेतल्यानंतर रात्री दोघेही हिवरा मार्गे आजनसराकडे निघाले. या मार्गादरम्यान बाळू राडे यांच्या शेताजवळ चार रानडुकरे सैरावैरा धावत त्यांच्या दुचाकीला येऊन धडकले. यात दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले. अपघातानंतर प्रवीणने उठून एकनाथ याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो उठत नसल्याने प्रवीणने चुलतभाऊ रोशन नासरे याला फोनवरून माहिती देऊन बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनीही एकनाथला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी नोंद घेतली आहे. तपास सुरू आहे.

Web Title: Two people were killed and one injured in a collision between a pig and a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.