भरधाव कार झाडावर धडकली, दोन जण जागीच ठार; कुटुंबावर पसरली शोककळा

By चैतन्य जोशी | Published: November 3, 2022 12:00 PM2022-11-03T12:00:29+5:302022-11-03T12:01:13+5:30

वर्धा-आर्वी मार्गावरील कामठी शिवारातील घटना

two people died on the spot as the speeding car hits a tree | भरधाव कार झाडावर धडकली, दोन जण जागीच ठार; कुटुंबावर पसरली शोककळा

भरधाव कार झाडावर धडकली, दोन जण जागीच ठार; कुटुंबावर पसरली शोककळा

googlenewsNext

आंजी (मोठी) : भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात २ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कामठी शिवारात झाला. ३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नागरिकांना अपघात झाल्याचे लक्षात आले. या अपघाताने मृत युवकांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

प्रज्वल राजू डंभारे (२९), राहुल ओमदेव धोंगडे (३२) (दोघे रा. आंजी) अशी मृतकांची नावे आहेत. प्रज्वल आणि राहुल हे दोघेही एमएच ३२ - सी ८४५३ क्रमांकाच्या कारने गावी जात होते. दरम्यान, कामठी शिवारात कार अचानक अनियंत्रित झाल्याने समोरील झाडावर जाऊन आदळली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. कारचे पत्रे अक्षरशः गॅस कटरने कापून दोघांचेही मृतदेह कारबाहेर काढण्यात आले.

रस्त्याच्या बाजूला जवळपास १५ फूट अंतरावर जाऊन कोसळल्याने रात्रीच्या वेळी कुणालाही माहिती पडले नाही. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याचे निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद सानप, अमर हजारे, विठ्ठल केंद्रे यांनी घटनास्थळी जात पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. अपघाताची वार्ता गावात पोहोचताच हळहळ व्यक्त केली जात होती.

दोघांचाही सामाजिक कार्यात होता समावेश

प्रज्वल भीम टायगर सेनेचा पदाधिकारी होता. ग्राम सुरक्षा दलातही तो सक्रिय सहभागी होता. कोरोनात त्याने स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. तसेच राहुल हा भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचा स्वीय साहाय्यक म्हणून कार्यरत होता. मागील वर्षीच त्याचा विवाह झाला होता. दुर्दैवाने दोघांवरही काळ ओढवल्याने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: two people died on the spot as the speeding car hits a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.