शेततळ्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; समुद्रपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 15:31 IST2022-04-04T15:01:55+5:302022-04-04T15:31:24+5:30
रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले.

शेततळ्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; समुद्रपूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वर्धा : समुद्रपुर तालुक्यातील शेडगाव जुनापाणी शिवारात दोन मुलांचा खेळता खेळता शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी (दि. ३) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतक सख्खे बहीण-भाऊ आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शेडगाव जुनापाणी शिवारात नागपूर येथील देवांनन पंचभाई यांच्या शेतात शैलेश कुंभरे (रा. शालीवाडा, जि. शिवनी मध्य प्रदेश) अडीच वर्षापासून कामाला आहे. कुमरेंना शितल शैलेश कुमरे (वय ६) व शिवम शैलेश कुमरे (वय ४) ही दोन मुले आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता आधी मुलाचे मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी धाव घेत तळ्यात बघितले असता मुलीचाही मृतदेह दिसून आला.या घटनेने कुमरे दाम्पत्यावर आभाळच कोसळले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पुढील तपास समुद्रपुर पोलीस करीत आहे.