Thieves continue to thrive even in lockdown | संचारबंदीतही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

संचारबंदीतही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात घट आली होती. पण, सध्या चोरट्यांनी याचा फायदा घेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीच्या काळात वाढत्या चोऱ्या रोखणे हे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

पतंजली दुकान फोडले
आर्वीनाका परिसरात असलेले पतंजलीचे दुकान चोरट्याने रात्रीच्या सुमारास फोडले. सुमारे दोन हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. आशिष मुडे हे आर्वीनाका परिसरात कुटुंबासह राहतात. ते पतंजलीचे दुकान चालविण्याचे काम करतात . रात्रीच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करीत अंदाजे दोन हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१२ कोंबड्यांची चोरी
विकास गणेश काळे रा. गणेशनगर बोरगाव यांनी त्यांच्या मालकीच्या १२ कोंबड्या शेतातील गोठ्यात ठेवल्या होत्या. चोरट्याने रात्रीच्या सुमारास त्यांच्या ७ हजार किंमतीच्या १२ कोंबड्या चोरून नेल्या. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पाणी तपासणी प्रयोगशाळेत चोरी
शहरातील पाणी तपासणी प्रयोग शाळेत चोरट्याने चोरी करीत सहा बॅटºया चोरून नेल्या. अनुप रामचंद्र नागदेवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर काम केले आणि ते रात्री निघून गेले. मंगळवारी कर्मचारी कार्यालयात आले असता त्यांना कार्यालयाच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. अनुप नागदेवे यांनी कार्यालयात जात पाहणी केली असता नऊ हजार किंमतीच्या युपीएस,पीएसच्या सहा बॅटरी चोरट्याने चोरून नेलेल्या दिसून आल्या. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कृत्रिम रेतन केंद्रात चोरी
वर्धा : गो.से.वाणिज्य महाविद्यालयासमोर असलेल्या कृत्रीम रेतन केंद्रात चोरट्याने चोरी करीत संगणक साहित्यासह इतर सहित्य असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने शासकीय कार्यालये दोन दिवसाआड कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने पशुधन विकास अधिकारी विवेक चिकाटे यांनी शनिवारी सकाळी कार्यालय उघडले. रात्रीच्या सुमारास कार्यालय बंद करून सर्व कर्मचारी घरी निघून गेले. मंगळवारी कार्यालयात आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरी करीत कार्यालयातील फ्रिज, प्रिंटर, द्रवनपात्रे असा एकूण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. विवेक चिकाटे यांच्या तक्रारीहून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves continue to thrive even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.