देवळी (वर्धा) : सततचा पाऊस, त्यानंतर पिकांवर आलेल्या रोगामुळे लावलेला पैसाही निघेल की नाही, या विवंचनेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील पिकांची अवस्था पाहून शेतातच विष गटकले. यातच त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रत्नापूर येथे मंगळवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली.
दिनेश नानाजी मडावी (३८) रा. रत्नापूर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत व त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे वडिलोपार्जित ३ हेक्टर ५४ आर शेती असून, त्यावर बँक ऑफ इंडिया भिडी शाखेचे एक लाखाचे कर्ज आहे. दोन महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने ही शेती तिघा भावांत विभागली गेली. त्यामुळे मृताच्या नावे पावणेतीन एकर शेती आली असून, त्यामध्ये सोयाबीन व कपाशीची लागवड केली. या पिकाची अवस्था वाईट असून लागवडीकरिता पैसा नाही. बँकही नव्याने कर्ज द्यायला तयार नाही, यामुळे विवंचनेत असलेल्या दिनेशने मंगळवारी सकाळी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.
दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. मृताच्या पश्चात पत्नी, लहान मुलगी, आई, दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तलाठी मरस्कोले यांनीही पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना पाठविला. पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.