दुरावलेल्या २५ दिवसांच्या 'बिबट्या'ला पुनश्च मिळाले 'मातृछत्र'

By महेश सायखेडे | Published: March 10, 2023 05:39 PM2023-03-10T17:39:52+5:302023-03-10T17:43:55+5:30

दोघांच्या डोळ्यात होती आभाळाएवढी व्याकूळता

The 25-day-old Leopard cub finally met his mother, wardha | दुरावलेल्या २५ दिवसांच्या 'बिबट्या'ला पुनश्च मिळाले 'मातृछत्र'

दुरावलेल्या २५ दिवसांच्या 'बिबट्या'ला पुनश्च मिळाले 'मातृछत्र'

googlenewsNext

वर्धा : आई खरंच काय असते? लेकराची माय असते. वासराची गाय असते. दुधाची साय असते. लंगड्याचा पाय असते. धरणीची ठाय असते. आई भेटते तो अनुभव म्हणजे एक स्वर्गाची अनुभूती असते, असाच काहीसा प्रसंग आईपासून दुरावलेल्या अवघ्या २५ दिवसांच्या बिबट्याच्या आईसोबत पुनर्मिलन करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह वन्यजीव प्रेमींना गुरुवारी मध्यरात्री आला. इतकेच नव्हे तर त्या दोघांच्याही डोळ्यात आभाळाएवढी व्याकूळताही बघावयास मिळाली.

आर्वी तालुक्यातील दहेगाव नजीकच्या पांझरा शिवारातील प्रल्हाद बडोदे यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी बिबट्याचे पिल्लू आढळून आले. बिबट्याचे पिल्लू बघून परिसरात एकच तारांबळ उडाली. शिवाय या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी झाली. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव, वनविभागाचे निगोट, मेश्राम, सावंत, चव्हाण, तंबाखे, जी. बी. शेख, भालेराव यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित रेस्क्यू केले. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लाची आरोग्य तपासणी करीत बिबट्याच्या पिल्लाचे आईसोबत पुनर्मिलन करण्याचा निश्चय वनविभागाने केला.

या कार्यात पीपल फॉर ॲनिमल्सच्या स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात आली. आईसोबत पुनर्मिलन करून देण्याच्या उद्देशाने वनविभागाचे अधिकारी व वन्यजीव प्रेमी २५ दिवसांच्या बिबट्याच्या पिल्लाला सोबत घेऊन रात्रीच्या काळोखात स्वत:च्या जीवावर उदार होत नियोजित ठिकाणी पोहोचले. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लास एकांतात सोडून त्याच्या हालचालींवर ट्रॅप कॅमेराच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात आला. मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजताच्या सुमारास डोळ्यात आभाळा एवढी व्याकूळता असलेली बिबट्याची आई पिल्लाचा आवाज ऐकून पिल्लाजवळ पोहोचली. शिवाय तिने तिच्या पिल्लाला तोंडात धरून जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले.

शास्त्रोक्त पद्धतीचा झाला वापर

बिबट्याच्या बछड्याची आरोग्य तपासणी करून तो सुदृढ आहे काय याबाबतची खातरजमा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. त्यानंतर त्याचे आई सोबत पुनर्मिलन होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. या कार्यात उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनसंरक्षक बोबडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. शिवाय पीपल फॉर ॲनिमल्सचे कौस्तुभ गावंडे, ऋषिकेश गोडसे यांची प्रत्यक्ष कृती उपयुक्त ठरली.

Web Title: The 25-day-old Leopard cub finally met his mother, wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.