'ती बीसीएचे शिक्षण घेत होती, त्याला प्रेमसंबंध हवे होते' नकार सहन न झाल्याने त्याने गळा आवळून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:24 IST2025-11-07T19:22:57+5:302025-11-07T19:24:25+5:30
आरोपीस रात्रीतूनच केली अटक : सावंगी (मेघे) परिसरातील घटनेने खळबळ

'She was studying BCA, he wanted a love affair' Unable to bear the rejection, he strangled her to death
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या १७ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून कथित प्रियकराने ओढणीने गळा आवळून हत्या केली. ही घटना सावंगी (मेघे) परिसरात ५ रोजी रात्रीच्या सुमारास उजेडात आली. या घटनेने सावंगी परिसरात मात्र, एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून सावली (वाघ) गाव गाठत आरोपीला अटक केल्याची माहिती दिली.
रोशन नारायण वावधणे (२४ रा. वाघसावली) असे अटक आरोपीचे नाव आहे. १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी सावंगी येथील एका महाविद्यालयात बीसीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. ती रुग्णालय परिसरात असलेल्या एका व्यक्तीच्या घरी किरायाची खोली करून राहत होती. आरोपी रोशन वावधणे हा तिला मागील काही वर्षापासून त्रास देत होता. त्याने तिच्या खोलीत जात तिला प्रेमसंबंध ठेवण्यास आग्रह धरला. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. ही बाब आरोपीला खटकली त्याने तिच्या खोलीतच तिच्याच ओढणीने गळा आवळून हत्या करत तेथून पोबारा केला. याप्रकरणी सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपीचा फोटो दाखवून केले 'कन्फर्म'
मृत तरुणीच्या घरच्यांनी तत्काळ सावंगी परिसर गाठून आरोपी रोशनचा फोटो खोलीच्या मालकाला दाखवून हा खोलीवर आला होता का, याबाबत विचारणा केली. खोली मालकाने आरोपी रोशनच खोलीवर आला असल्याची खात्री केल्याने घरच्यांनी थेट सावंगी पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करून आरोपीस बेड्या ठोकल्या.
मैत्रिणीला आढळली बेशुद्ध अवस्थेत...
मृत तरुणीच्या घरच्यांनी तिच्या मोबाइलवर फोन केला. मात्र, मृत तरुणीने फोन न उचलल्याने घरच्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून ही बाब सांगितली. मृत तरुणीच्या मैत्रिणीने सावंगी परिसरात किरायाने केलेल्या खोलीत जात पाहणी केली असता खोलीचे दार अर्धवट उघडलेले दिसले. तिने पाहणी केली असता तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडून होती. तिला सावंगी रुग्णालयात नेले असता तिच्या गळ्यावर गळफास घेतल्याचे व्रण दिसून आले. ही बाब तिच्या मैत्रिणीने घरच्यांना सांगितली.
'एसपीं'नी केली पाहणी
घटना घडल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी पोलिस अधीक्षकांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली.