लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अवयव दानाबाबत शासनाच्यावतीने पंधरवडा घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. असे असताना अनेकांत याबाबत काही गैरसमज आहेत. सध्याच्या विज्ञान युगात हे गैरसमज दूर व्हावेत व अवयव दानाकडे नागरिकांचा कल वाढावा या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन नाशिक येथील कातकाडे, डोंगरे व सांकळे कुटुंबियांनी नवीन वर्षाचे औचित्य साधत सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला. शनिवारी त्यांची ही यात्रा वर्धेत दाखल झाली होती. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट देत त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचीही भेट घेतली. रॅलीतील सदस्य अवघ्या २० दिवसांमध्ये सुमारे ३ हजार किमीपेक्षा जास्तचा प्रवास पूर्ण करीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवयव दानाबाबत जनजागृती करीत आहेत.नाशिक येथून ३१ डिसेंबरला प्रारंभ झालेल्या जनजागृतीपर रॅलीने पिंपळगाव, चांदवड, मनमाड, पानेवाडी, मनमाड, मालेगाव, धुळे, नंदूरबार (प्रकाशे), अंमळनेर, जळगाव, शेगांव, अकोला, अमरावती, नागपूर मार्गक्रमण करीत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गाठले. सायंकाळी उशीरा ही जनजागृतीपर सायकल रॅली पुढील प्रवासाकरिता यवतमाळच्या दिशेने रवाना झाली. ही जनजागृतीपर सायकल रॅली यवतमाळ, माहुरगड, नांदेड, अंबेजोगाई, लातुर, तुळजापूर, पंढरपूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गणपतीपुळे, चिपळूण, रायगड, अलिबाग, पनवेल, मुंबई, ठाणे, कसारा घाट, नाशिक असा एकूण ३ हजार किमीपेक्षा जास्तचा प्रवास पूर्ण करणार आहे. या रॅलीचा समारोप २० जानेवारीला नाशिक येथे होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.चमुत अकरा जणांचा समावेशजनजागृतीपर सायकल रॅलीत रत्ना ठकोबा डोंगरे, विनायक श्रीपत कातकाडे, माधव ठकोबा डोंगरे, ताराचंद ठकोबा डोंगरे, पुनम माधव डोंगरे, किरण ताराचंद डोंगरे, योगेश गंगाराम डोंगरे, दिनेश रामभाऊ सांगळे, अंकुश कैलास सांगळे, वेदांत माधव डोंगरे, सुरेश ठकोबा डोंगरे यांचा समावेश आहे.विविध विषयांवर केली जातेय जनजागृतीसदर रॅलीच्या माध्यमातून नाशिक येथील कातकाडे, डोंगरे व सांकळे कुटुंबिय अवयव दान, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’, ‘झाडे लावा-झाडे जगवा’, ‘प्लास्टिक निर्मूलन’, ‘सायकल चालवा-इंधन वाचवा’ आदी विषयांवर जनजागृती करीत आहेत.विद्यार्थ्यासह नागरिकांशी साधतात संवाद‘सायकल टूर फॉर लाईफ रिसायकल’ हे घोष वाक्य घेऊन नाशिक येथून विविध जिल्ह्यांचा प्रवास करून सेवाग्राम येथे पोहोचलेल्या सायकल यात्रेतील सदस्य आळीपाळीने सायकल चालवितात. इतकेच नव्हे तर ते शाळा, महाविद्यालय, कार्यालयात जाणून विद्यार्थ्यांसह नागरिकांशी संवाद साधतात.
सायकल रॅलीतून अवयव दानावर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:53 IST
अवयव दानाबाबत शासनाच्यावतीने पंधरवडा घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. असे असताना अनेकांत याबाबत काही गैरसमज आहेत. सध्याच्या विज्ञान युगात हे गैरसमज दूर व्हावेत व अवयव दानाकडे नागरिकांचा कल वाढावा या हेतूला....
सायकल रॅलीतून अवयव दानावर जनजागृती
ठळक मुद्दे२० दिवसात ३ हजार किमीचा प्रवास : नाशिक येथील तीन परिवाराचा उपक्रम