गुन्हा करून मौजमजेसाठी गोव्याला पळून जाण्याचा बेत फसला; खंडणीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:46 IST2026-03-02T17:41:21+5:302026-03-02T17:46:15+5:30
Wardha : खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी गोव्यात पळून जाण्याच्या बेतात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना जेरबंद केले.

Plan to commit crime and escape to Goa for fun foiled; Four arrested in extortion case
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आरोपी गोव्यात पळून जाण्याच्या बेतात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना जेरबंद केले.
पांडुरंग डफरे (५२), रा. भिडी, ता. देवळी यांना त्यांच्या गावातील राकेश वागन्ना व इतर पाच अनोळखी व्यक्तींनी भिडी येथून जाणाऱ्या महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण का उठवले, या कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केली होती. एवढेच नव्हे तर डफरे यांना पैशाची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी बीएनएस कलम १४०(२), १४० (३), ११८(१), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ (५) नुसार गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. आरोपींचा शोध सुरू होता.
कारंजा ते मूर्तिजापूर रोडवर रचला सापळा
- आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब वैभव निखाडे, शुभम सावरकर घटनेपासून पसार होते. ते शनिवारी ओळख लपवून कारची नंबर प्लेट काढून विना क्रमांकाच्या कारने समृद्धी मार्गाने गोवा येथे पळून जाण्याच्या येथील हिरा कोहचाडे, अमोल आखाडे, तयारीत होते.
- माहिती मिळताच गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गावरील टोल प्लाजावरून विना क्रमांकाच्या कारची माहिती घेतली. ती कार शिवणी टोल प्लाजा, जि. अमरावती येथील टोल प्लाजावरून समृद्धी महामार्गावर गेल्याची माहिती मिळाली.
- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारंजा (लाड) ते मूर्तिजापूर रोडवर आरोपी उभे दिसले. पथक सापळा रचून त्यांच्याकडे जात असताना आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना ताब्यात घेतले. हिरा कोहचाडे (२८), अमोल आखाडे (३२), वैभव दीपक निखाडे (२९) आणि शुभम विठ्ठल सावरकर (२८), चौघेही रा. कळंब अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
विना क्रमांकाची कार केली जप्त
- आरोपींनी राकेश वागन्ना, रा. भिडी आणि बादल थूल, रा. दुरगडा यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपींजवळून विना क्रमांकाची कार, रोख ५३ हजार ९८० रुपये, आठ मोबाइल, असा एकूण १२ लाख ८९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना देवळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
- पुढील तपास देवळी पोलिस करीत आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू, सहायक फौजदार मनोज धात्रक, हवालदार हमीद शेख, महादेव सानप, दिनेश बोथकर, गोविंद मुंडे, विनोद कापसे यांनी केली.