पसायदान म्हणजे विश्वसुखाची प्रार्थना

By Admin | Updated: January 7, 2016 02:46 IST2016-01-07T02:46:41+5:302016-01-07T02:46:41+5:30

सामान्य माणसे स्वत:साठी ईश्वराकडे काही मागतात. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी काहीही न मागता विश्वसुखाची मागणी केली आहे.

Pasayadan is a trustworthy prayer | पसायदान म्हणजे विश्वसुखाची प्रार्थना

पसायदान म्हणजे विश्वसुखाची प्रार्थना

सुधीर बोधनकर : कावळे स्मृती व्याख्यानमाला
वर्धा : सामान्य माणसे स्वत:साठी ईश्वराकडे काही मागतात. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी काहीही न मागता विश्वसुखाची मागणी केली आहे. मानवाला सतत विवेकाने वागण्याची आणि विकाराला टाळण्याची प्रेरणा देणारी प्रार्थना म्हणजे पसायदान होय, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ. सुधीर बोधनकर, नागपूर यांनी केले. डॉ. वि.गं. कावळे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या खरे सभागृहात विदर्भ साहित्य संघ शाखा आणि कावळे परिवाराद्वारे डॉ. बोधनकर यांचे ‘पसायदान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सल्लागार डॉ. सुनीता कावळे, शाखा समन्वयक सचिव प्रदीप दाते, डॉ. बैंदूर यांची उपस्थिती होती.
डॉ. बोधनकर पुढे म्हणाले, पसायदानाचे नऊ श्लोक म्हणजे मराठी साहित्यातील नवरत्नांचा हार होय. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर मातृहृदयी असल्यानेच माऊली या पदाला सार्थ ठरतात. ज्ञानेश्वर केवळ मानवाच्या हिताचाच विचार करीत नाहीत, तर संपूर्ण सजीवसृष्टीच्या सुखाची मागणी करतात. त्यांचे पसायदान हे जीवनाचे शास्त्र आहे आणि वैगुण्याविरुध्द लढणारे शस्त्रही आहे.
यावेळी डॉ. भैरवी काळे यांनी भक्तिरचना सादर केली. डॉ. बैंदूर यांनी वि.गं. कावळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. संचालन ईशान कावळे यांनी केले. अतिथींचा परिचय रंजना दाते यांनी दिला. योगेंद्र कावळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ. स्मिता कावळे, दीप्ती बगे, प्रा.राजेंद्र मुंढे, प्रा. पदमाकर बावीस्कर, प्रशांत पनवेलकर, गंगाधर पाटील, प्राचार्य विजय व्यास आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Pasayadan is a trustworthy prayer