वर्ध्यातील केवळ २२ बाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत ! जमीन गेली १३ हजार हेक्टर वाहून; प्रशासन म्हणत केवळ दोन हेक्टर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 13:06 IST2025-10-16T13:05:00+5:302025-10-16T13:06:10+5:30
Wardha : पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Only 22 affected farmers in Wardha will get help! 13 thousand hectares of land has been washed away; Administration says only two hectares?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, प्रशासनाच्या लेखी अहवालात सप्टेंबरमध्ये केवळ १.८ हेक्टरच शेतजमीन खरडून गेली. केवळ १०.९ हेक्टरवरील शेतजमिनीत गाळ साचला आहे, असे म्हटले आहे. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच नाही का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पुरामुळे जवळपास १३ हजार हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकरी सांगतात. आता पीक घेण्यासाठी सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुरामुळे वर्धा, सेलू, देवळी तालुक्यातील पाच हजार ४०० हेक्टरवरील माती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले जाते. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील चार हजार ६०० हेक्टरवरील सुपीक माती वाहून गेली. हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातही तीन हजार हेक्टरवरील माती पुरामध्ये वाहून गेल्याचे सांगण्यात येते.
कृषी विभागाने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने किती जमीन खरडून गेली, जमिनीत किती गाळ साचला, याचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार वर्धा तालुक्यात ४५ हेक्टर, तर देवळी तालुक्यात १.२५ हेक्टर, अशा एकूण १.७ हेक्टर क्षेत्रावरील माती खरडून, वाहून गेल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन तालुक्यांतील केवळ चार शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाईनुसार केवळ ७९ हजार ९०० रुपये मदत मिळणार आहे.
केवळ ११ हेक्टरमध्ये साचला गाळ
कृषी विभागाच्या सप्टेंबर महिन्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील केवळ १०.९ हेक्टरवरील शेतीत तीन इंच किंवा त्यापेक्षा जास्त गाळ साचला आहे. यात केवळ हिंगणघाट तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या शेतीत गाळ साचल्याचे स्पष्ट करण्यात आले. २ या १८ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांप्रमाणे एक लाख ९६ हजार २०० रुपयांची मदत मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अहवालानुसार शेती खरडून जाणे आणि गाळ साचण्याच्या निकषानुसार जिल्ह्यातील केवळ २२ शेतकऱ्यांना दोन लाख ७६ हजार १०० रुपयांची मदत मिळेल, असे दिसून येत आहे.
सोयाबीनची झाली माती, कपाशीची बोंडे सडली
अतिवृष्टीमुळे सोयाबीनची माती झाली आहे. कपाशीची बोंडे सडली आहेत. त्यामुळे यंदा उत्पन्नात घट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यांना दरवर्षी नवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहे. शासन तेवढ्यापुरते आश्वासन देते. मात्र, त्याची पूर्तता होताना दिसत नाही. शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला पुरेशी मदत देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नदी, नाल्यांकाठावरील पिकांना फटका
नदी आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. जमिनी, तसेच पिके खरडून गेली. बांधबंधिस्ती उद्ध्वस्त झाली. अतिवृष्टीमुळे सुपीक माती वाहून गेली. माती वाहून गेल्यामुळे सुपीक माती आणायची कुठून, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.
"सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचे तालुकानिहाय अहवाल मागविण्यात आले. त्या अहवालानुसार जिल्ह्यातील स्थिती किती शेतजमीन खरडून गेली, किती जमिनीत गाळ साचला, याबाबत माहिती सादर करण्यात आली आहे."
- रमाकांत कांबळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा