दुचाकीची मालवाहूला धडक, एक गतप्राण; नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:24 IST2021-11-26T17:20:19+5:302021-11-26T17:24:37+5:30
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

दुचाकीची मालवाहूला धडक, एक गतप्राण; नागपूर-अमरावती महामार्गावरील घटना
वर्धा : पेट्रोल पंपावरून इंधन भरून महामार्ग ओलांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकी चालक ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग बावरी याने आपल्या ताब्यातील एम. एच. ३० बी. के. १२८२ क्रमांकाची दुचाकी समोरून येणाऱ्या मालवाहूवर चढविली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील आष्टी टि-पाईंटवर परिसरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.
ईश्वरसिंग ऊर्फ बंटीसिंग ददारसिंग बावरी हा मूळचा देवीखदान अकोला येथील रहिवासी आहे. तो त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन आष्टी टि-पॉईंंट परिसरात आला असता मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या एम. एच. ३० बी. डी. २५५१ क्रमांकाच्या मालवाहूला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चुराडाच झाला, तर मालवाहूचा पुढील भाग चपकला.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांसह तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. शिवाय जखमीला रुग्णालयाकडे रवाना केला, पण वाटेतच गंभीर जखमीची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी तळेगाव पोेलिसांनी मालवाहूचालक शेख असलम रा. मूर्तीजापूर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी राजू शाहू, संदीप महाकाळकर, रमेश पर्बत, अमोल इंगोले करीत आहेत.