हळदीच्या जेवणानंतर करत होते परतीचा प्रवास, मध्येच झाला घात; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 15:12 IST2022-05-07T15:08:06+5:302022-05-07T15:12:22+5:30
दुचाकी बायपासवरील शिवशंकर भोजनालयासमोर येताच यवतमाळकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेने दुचाकीला जबर धडक दिली.

हळदीच्या जेवणानंतर करत होते परतीचा प्रवास, मध्येच झाला घात; एक ठार, एक गंभीर
देवळी (वर्धा) : देवळी बायपासवरील शिवशंकर भोजनालयासमोर भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला तर, मागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला असून जखमीला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक अनिकेत नांदूरकर (रा. देवळी) असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सौरभ झाडे (रा. पळसगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ते दोघे वायगाव (नि.) मार्गावरील दत्त मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यानिमित्ताने आयोजित हळदीचे जेवण करून दुचाकीने (एम. एच. ३२ झेड. डी. ९३२९) परतीचा प्रवास करीत होते.
दुचाकी बायपासवरील शिवशंकर भोजनालयासमोर येताच यवतमाळकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेने (एम. एच. ३२ क्यू. ११५६) दुचाकीला जबर धडक दिली. यात डोक्याला जबर मार लागल्याने नांदूरकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर झाडे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.