वर्धा ते यवतमाळ रेल्वे मार्गाच्या कामावर आक्षेप ! पूल बांधकामात गंजलेल्या सळाखीचा केला जातोय सर्रास वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 18:01 IST2025-11-15T18:00:59+5:302025-11-15T18:01:56+5:30
Wardha : मागील काही वर्षापासून वर्धा ते यवतमाळ या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. एक ते दीड वर्षापूर्वी वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे; पण, या रेल्वेरुळादरम्यान नागपूर ते यवतमाळ महामार्ग येत असल्याने या महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

Objections to the work of the Wardha to Yavatmal railway line! Rusty bars are being widely used in the construction of the bridge
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा ते यवतमाळरेल्वे मार्गाचे काम सुरू असून सोलोड (हिरपूर) बायपासवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामात गंजलेल्या सळाखीचा वापर केला जात असून सालोड ग्रामपंचायतील लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला असून हे काम थांबवून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मागील काही वर्षापासून वर्धा ते यवतमाळ या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. एक ते दीड वर्षापूर्वी वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे; पण, या रेल्वेरुळादरम्यान नागपूर ते यवतमाळ महामार्ग येत असल्याने या महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सालोड (हिरपूर) बायपासवर पुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याने सालोड ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी पुलाची पाहणी केली असता त्यामध्ये गंजलेल्या सळाखींचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात रेल्वेच्या अभियंत्यांशी संपर्क साधून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी केल्याचे सांगितले. यामध्ये गंजलेल्या सळाखी वापरल्या तर गुणवत्ता ढासळेल, असेही त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
"सालोड बायपासवरील रेल्वे पुलाच्या बांधकामात गंजलेल्या सळाखींचा वापर केला जात असल्यासंदर्भात कोणतीही तक्रार आली नाही. यासंदर्भात माहिती घेऊन पुलाचे काम गुणवत्तापूर्ण करण्यावर भर असणार आहे."
- योगेंद्रसिंग बैस, मुख्य अभियंता, रेल्वे विभाग