गारपीटग्रस्तांच्या यादीत भूमिहिनांची नावे
By Admin | Updated: July 7, 2014 23:43 IST2014-07-07T23:43:19+5:302014-07-07T23:43:19+5:30
फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने

गारपीटग्रस्तांच्या यादीत भूमिहिनांची नावे
चौकशीची मागणी : नुकसान झालेले शेतकरी मदतीपासून वंचित
सेलगाव (लवणे) : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रबी पीक खराब झाले. या नुकसानीचा सर्व्हे करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या; पण येथील तलाठ्याने सर्व्हे न करता खोटा अहवाल सादर केला. या अहवालात गावातील भूमिहीनांची नावे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे या अहवालाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रबी हंगामात आलेल्या पावसात शेतातील गहू, चना, संत्रा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे शेतात जाऊन करणे गरजेचे असताना तलाठ्याने कार्यालयात बसून सर्व्हे केला. खोटे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आला़ हा अहवाल शासनास सादर करण्यात आला़ या यादीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा बागा नाहीत, त्यांच्या नावावरही संत्रा बागा दाखवून अनुदान मिळवून देण्यात आले़ भूमिहीनांच्या नावे सातबारा नाही, त्यांची नावेही गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत; पण पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याने यादीतून वगळले आहे.
याबाबत तलाठ्यास विचारणा केली असता, तो कुणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही़ यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार बालपांडे यांच्याकडे तक्रार केली; पण तहसीलदारांनीही याकडे विशेष लक्ष दिले नाही. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून वगळलेल्या शेतकऱ्यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करावी व भूमिहीनाला लाभ मिळवून देणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. खरोखरच गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ते हतबल झाले आहेत़(वार्ताहर)