Monthly 'ultimatum' for mining lenders | खाणपट्टेधारकांना महिनाभराचा ‘अल्टिमेटम’

खाणपट्टेधारकांना महिनाभराचा ‘अल्टिमेटम’

ठळक मुद्देतहसीलदारांना बजावली नोटीस । क्रशर मशीन उचलण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुदत संपूनही दोन वर्षांपासून येळाकेळी येथे अवैधपणे उत्खनन सुरू होते. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करीत १३ खाणपट्टे ताब्यात घेत क्रशर मशीन व दोन हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. आता खाणपट्टेधारकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून महिनाभरात क्रशर मशीन हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे खाणपट्टेधारकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपये खर्चून नवीन मशिन लावत आपली मुजोरी कायम ठेवली. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत येळोकेळी येथील तेरा खाणपट्टे शासनजमा केले आहेत. तेथे लावलेल्या १३ क्रशर मशीनलाही सिल ठोकले. सोबतच २ हजार ब्रास गिट्टी, चुरी व डस्टही जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या साहित्याच्या सभोवताल चुन्याने आखणी केली आहे. याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून पुढील कारवाईला गती देण्यात आली. आता तेराही खाणपट्टेधारकांना नोटीस बजावून त्यांच्या खाणपट्ट्यांवर लावलेल्या क्रशर मशीन महिनाभरात तेथून हटवून खाणपट्टा खाली करावा, अन्यथा शासन जमा करण्यात येईल, अशा सूचनाही महसूल प्रशासनाच्या देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता खाणपट्टेमालकांना आपला गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. प्रशासनही खाणपट्टे खाली करून नव्याने लिलाव करण्याच्या कामाला लागले आहे.

बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) येथे होणार कारवाई
येळाकेळी येथील कारवाईनंतर सर्व खाणपट्टेधारकांचे धाबे दणाणले आहे. सर्व खाणपट्टे शासनजमा करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून कारवाईला गती दिली आहे. वर्ध्याच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी शनिवारी बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) व डोरली येथील सहा खाणपट्ट्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये सावंगी (मेघे) येथील चोथमल लालवाणी, भीमसेन लालवाणी, सतीश जेठवा, चंद्रकांत दौड तर बोरगाव (मेघे) येथील मनोज कावरे व डोरली येथील शेख नझीम शेख रज्जाक यांच्या खाणपट्ट्यांचा समावेश आहे. आता यांच्या खाणपट्ट्यांची सखोल माहिती घेऊन अनधिकृत असल्यास त्यांनाही नोटीस बजावून कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी सांगितले.

येळाकेळी येथील तेरा खाणपट्ट्यंवर कारवाई केल्यानंतर इतरही खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. आता येळाकेळी येथील जप्त केलेल्या मालाचा खुलासा करण्यासंदर्भात तहसीलदारांनी खाणपट्टेधारकांना नोटीस बजावली आहे. तसेच यंत्रसामग्रीही उचलून खाणपट्टा खाली करण्याकरिता महिनाभराचा कालावधी दिला आहे. या महिनाभरात सर्व खाणपट्टे शासनाच्या ताब्यात येऊन पुढील कारवाई केली जाईल.
डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा

Web Title: Monthly 'ultimatum' for mining lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.