Import and export of milk, fruit and vegetables in Wardha district is banned | वर्धा जिल्ह्यात दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या आयात-निर्यातीवर बंदी

वर्धा जिल्ह्यात दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या आयात-निर्यातीवर बंदी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेशकोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर तसेच अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढले आहेत. परंतु, सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच सेफ झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच मांस तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे.
भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजी, दुध, मांस व फळ आणण्यास तसेच वर्धा जिल्ह्याबाहेर सदर जीवनावश्यक वस्तू पाठविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी या सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भाजीबाजार, फळ व मांस विक्रीचे दुकान दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांनाची कुठल्याही परिस्थित गैरसोय होणार नाही याची दक्षताही जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन मुबलक
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. सध्या अनेक शेतकरी विविध भाजीपाला वर्गीय पिकांची नियमित तोड करून तो नाशवंत शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणत आहेत. तर काहींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या टमाटर, चवळी, वांगे, मिरची, वाल, काकडी, भेंडी, ढेमस, पालक, संभार, कांदा, शेवगा, पत्ताकोबी व फुलकोबीचे उत्पादन होत असून हा शेतमाल शेतकºयांच्या शेताच्या धुºयावरून थेट बाजारपेठेपर्यंत कसा येईल यासाठीही विशेष प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.

नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने पुढील सात दिवस वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दुध, मांंस व फळ इतर जिल्ह्यातून आणण्यास तसेच सदर जीवनावश्यक वस्तू वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय थोडा कठोर असला तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: Import and export of milk, fruit and vegetables in Wardha district is banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.