सेवाग्राम आश्रमात वैद्यकीय विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर : श्रमाचे महत्त्व आणि सेवेची प्रेरणा मिळण्यासाठी १९६९ मध्ये सुरू झाला उपक्रम दिलीप चव्हाण सेवाग्रामसंपूर्ण जगात अहिंसेचा संदेश प्रेषित करीत असलेल्या वास्तूत आम्ही आज वास्तव्याला आहोत हे खरच स्वप्नवत आहे. आरोग्यसेवा हे मिशन समजूनच वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहोत. आतापर्यंत पुस्तकातून पाहिलेले गांधीजी येथे रोज प्रत्यक्षात भेटतात. आपण आधी एक सामान्य माणूस आहोत ही भावना येथे मनात पक्की होते. अशा बोलक्या भावना कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालयात भारत भरातून वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झालेले आणि युवा पिढीचे प्रातिनिधी असलेले विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. गांधीजींच्या सहवासात आरोग्य सेवेचे व्रत घेऊन डॉ. सुशिला नायर यांनी कस्तुरबा आरोग्य संस्था व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या माध्यमातून अखंड आरोग्यसेवा सुरू केली. बापूंचे विचार आणि तत्वांवर आधारित संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गांधी जीवनाचा साक्षात्कार व्हावा आणि लोकसेवेचे बाळकडू मिळावे यासाठी १५ दिवसांचे संस्कार शिबिर नई तालिम समिती आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान परिसरात सुरू आहे. यातून विद्यार्थी मातीशी नाते, ग्रामीण क्षेत्राचे वास्तविक जीवन आणि आश्रमीय जीवन पद्धती अनुभवत आहे. केवळ पुस्तकातून आतापर्यंत भेटलेले गांधी ही मुले आज प्रत्यक्षात अनुभवत आहे.४६ वर्षांपासून श्रमदानाची परंपरा कायम १९६९ मध्ये महात्मा गांधी आयुर्विज्ञानची स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांचे पंधरा दिवसांचे संस्कार शिबिर घेतले जाते. सध्या देशभऱ्यातील ३० मुली आणि २९ मुले या शिबिरात सहभागी झाली आहेत. प्रवेश घेतल्या घेतल्याच सर्व विद्यार्थी वसतिगृहाऐवजी नई तालिम परिसरात आहेत. सकाही चार ते रात्री दहा असे वेळा पत्रक असून यात प्रात: प्रार्थना, योगसाधना, श्रमदान, सूतकताई व्याख्यान, खेळ, मुक्त वेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि शेवटी दिनक्रमाचे लेखन असे दैनिक कार्यक्रम आहे.हा वेगळाच आनंद...देशभरातील विविध जाती धर्मातील, गावखेड्यापासून तर महानगरात राहिलेली मुले येथे श्रमाचा अनुभव घेत आहेत. यातील अनेकांचा तर माती, श्रमदान, प्रार्थना एवढेच नव्हे तर सामूहिक जीवनाशी संबंधच आलेला नाही. आतापर्यंत गांधीयन थॉट्स या माध्यमातून त्यांनी गांधीजी अनुभवले ते केवळ परीक्षेपुरतेच. पण सेवाग्राम आश्रमात मात्र खऱ्या अर्थाने त्यांना गांधीजी कळत आहे. संस्काराचे बिजारोपण होत आहे. येथे राहण्याचा वेगळाच आनंद आम्ही अनुभवत असल्याचे हे विद्यार्थी सांगतात.
पुस्तकातील गांधी आश्रमात प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले
By admin | Updated: July 23, 2015 02:04 IST