गिमाटेक्सच्या कपडा विभागात भीषण आग; ९० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST2021-04-08T05:00:00+5:302021-04-08T05:00:17+5:30
कंपनीच्या कापड विभागात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच सुरुवातीला कामगारांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामगारांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, आग लागल्याची माहिती हिंगणघाट आणि देवळी येथील पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली.

गिमाटेक्सच्या कपडा विभागात भीषण आग; ९० लाखांचे नुकसान
हिंगणघाट : स्थानिक गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि. वणी येथील कपडा विभागात अचानक आग लागली. यात या विभागातील विविध साहित्यांसह कापड जळून कोळसा झाल्याने सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
कंपनीच्या कापड विभागात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच सुरुवातीला कामगारांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामगारांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, आग लागल्याची माहिती हिंगणघाट आणि देवळी येथील पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच या दोन्ही पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.
शॉर्टसर्कीट ठरले आगीस कारणीभूत
शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात असून आगीत सायझिंग मशीनरी, सूत, कच्चा माल, इलेक्ट्रीक केबल आदी साहित्याचा जळून कोळसा झाल्याने कंपनी प्रशासनाचे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.