नावरदेवासमोरच वरातीत बाप लेकाचा खून; दबा धरून बसलेल्या पुतण्याने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:21 IST2026-04-06T16:20:04+5:302026-04-06T16:21:02+5:30
Vardha : एकीकडे लग्नाचा आनंदसोहळा सुरू असताना अचानक झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने आनंदावर विरजण पडले. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलिस तपास करीत आहेत.

Father and son murdered in front of Groom during a wedding; nephew, who was waiting, stabbed them repeatedly
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा शहरात शनिवारी रात्री लग्नाच्या वरातीत दुहेरी खुनाचा थरार घडला. आनंदाचे वातावरण, वाजत-गाजत निघालेली वरात आणि घोड्यावर बसलेला नवरदेव यांच्यासमोरच, महिला आश्रम परिसरातील मारोती मंदिराजवळ, अल्पवयीन पुतण्याने सख्खा काका आणि चुलत भावाचा चाकूने भोसकून निघृण खून केला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रभाकर भलमे (५०) आणि त्यांचा मुलगा नितीन भलमे (२४) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे बरबडी येथील रहिवासी होते. शनिवारी रात्री त्यांच्या एका नातेवाइकाचा विवाह सोहळा वर्धा शहरात सुरू होता. वरातीत वन्हाडी मंडळी बँडच्या तालावर नाचत होती. वरात महिला आश्रम परिसरातील मारोती मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघाली आणि दबा धरून बसलेल्या अल्पवयीन पुतण्याने अचानक काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
पूर्ववैमनस्यातून हत्या...
भलमे कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून संपत्ती आणि जमिनीवरून वाद सुरू होते. आठ महिन्यांपूर्वी देखील त्यांच्यात मोठे भांडण झाले होते. आरोपी मुलाने हे हत्याकांड करण्यासाठी आधीच कट रचला होता आणि त्यासाठी ऑनलाइन चाकू देखील मागवला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चाकूहल्ल्याने आनंदावर पडले विरजण
एकीकडे लग्नाचा आनंदसोहळा सुरू असताना अचानक झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने आनंदावर विरजण पडले. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलिस तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी येत तातडीने कारवाई केली.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी
पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस निरीक्षक संतोष ताले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
रुग्णालयात दोघांचा मृत्यू
हल्ल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रभाकर आणि नितीन यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.