जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:10+5:30

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.

Employment of 3,652 persons in the district | जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

जिल्ह्यात ३,६५२ व्यक्तींना रोजगार

Next
ठळक मुद्देकौशल्य विकासातून ६५९ युवक वळले स्वयंरोजगाराकडे

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तातडीने नोकरी मिळणे सध्यातरी दुरापास्त झाले आहे. त्यामुळे युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या युवकांनाही प्रशिक्षणाचा आधार आहे. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन आणि निर्मिती, बँकिंग आणि अकाउटिंग, इलेक्ट्रिकल्स, फॅशन डिझायनिंग, गारमेंट तयार करणे याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. यातून आजपर्यंत ३ हजार ६५२ जणांना नोकरी व रोजगाराची संधी मिळाली आहे. तर ६५९ युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे नोकरीसाठी जिल्ह्यातून २० हजारांवर युवकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी सात हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक प्राधान्य माहिती तंत्रज्ञान, उत्पादन व निर्मिती, बँकिंग व अकाउंटन्सिग, इलेक्ट्रीकल्स गारमेंट तयार करणे या प्रशिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे.
यामध्ये काही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले युवक कौशल्य विकासाकडे वळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नोकरीच्या संधी वाढणार आहेत. स्थानिक युवकांना स्वत:च्या जिल्ह्यातच रोजगार हवा आहे. त्यामुळे हे युवक कौशल्य विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहेत.
पदवीधर झाल्यानंतर अनुभव नसल्याने किंवा एखाद्या उद्योगात नोकरी मिळविताना तेथील कौशल्य या युवकांना उपलब्ध नसते. त्यामुळे नोकरीची संधी गमवावी लागते. पण, कौशल्य विकासामुळे नोकरी तसेच व्यवसायाची संधी उपलब्ध होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार १४६ युवकांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले आहे. त्यापैकी ३ हजार ६५२ युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे. या माध्यमातून नोकरी मिळण्याचे प्रमाण अधिक आहे.
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांना नोकरीची संधी उपलब्ध असली तरी संसर्गाचा धोका असल्यामुळे युवक बाहेरच्या तालुक्यात व जिल्ह्यात जाण्याचे टाळत आहेत. अशा युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार किंवा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे युवकांनी संधीचे सोने केले पाहिजे.

लॉकडाऊन काळात ८६ युवकांना रोजगार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेकजण बेरोजगार झाले असून युवकांच्या हाताला काम नाही. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १ हजार ७६२ युवकांनी नोंदणी केली असून ८६ युवकांना रोजगार मिळाला आहे. तर ३२ युवकांनी स्वयंरोजगार उभा केला आहे.

महाजॉब पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
डीआयसीने महाजॉब पोर्टल सुरू केले असून युवकांनी महास्वयं पोर्टलसह महाजॉब पोर्टलवर सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करावी, तसेच जे एनजीओ, व्यक्ती प्रशिक्षण देण्यास इच्छुक असेल त्यांनी स्कील इंडिया पोर्टल (एनएसडीसी) या वेब पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल विकास विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Employment of 3,652 persons in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.