गुरुजी पडताळणीसाठी टीईटी प्रमाणपत्र जमा केले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST2022-03-09T05:00:00+5:302022-03-09T05:00:07+5:30
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत दहा आणि माध्यमिक विभागांतर्गत ४ अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आले आहे.

गुरुजी पडताळणीसाठी टीईटी प्रमाणपत्र जमा केले का?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकांचा टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला २०१३ ते २०१९ या कालावधीतील सर्व प्रमाणपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने टीईटीधारक शिक्षकांना प्रमाणपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील दहा शिक्षकांची प्रमाणपत्रे पुण्याला पाठविण्यात आली आहेत. आता या प्रमाणपत्रांची पुण्यात तपासणी सुरू असल्याने गुरुजींचीही धाकधूक वाढली आहे.
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत दहा आणि माध्यमिक विभागांतर्गत ४ अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये शिक्षक भरती न झाल्याने फारशी संख्या नाही. ज्या शिक्षकांची टीईटीव्दारे नियुक्ती झाली त्या सर्वांचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले असून आता काय निकाल लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
पुण्यात पोहोचले प्रमाणपत्र...
टीईटीच्या परीक्षेतील बोगसपणा चव्हाट्यावर आल्यानंतर अशा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविणाऱ्या गुरुजींची झोप उडाली आहे.
जिल्ह्यातही १४ शिक्षक टीईटीच्या माध्यमातून लागल्याने त्यांचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाने पुण्याला चौकशीकरिता पाठविले आहे.
गुरुजीचे देव पाण्यात
२०१२ पासून शिक्षक भरती बंद होती. प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गावर टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या अनेक जिल्ह्यात नियुक्त्या झाल्या. अशातच आता बोगस टीईटी प्रमाणपत्राचा काळाबाजार उघडकीस आल्याने अडचणी वाढल्या आहेत. याच काळ्या बाजारातून टीईटीचे प्रमाणपत्र मिळवून तर या नोकऱ्या बळकावल्या नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत २०१३ नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत १४ तर खासगी शाळेमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील दहा शिक्षक हे टीईटीव्दारे नियुक्त झाले आहेत. त्यामुळे प्राथमिक विभागाकडून या दहा शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासणीकरिता पाठविण्यात आले. तसेच माध्यमिकची चार प्रमाणपत्रे पाठविली आहेत.
निंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक