“BJP आणि RSS कडे इतिहासही नाही अन् भविष्यही नाही”; नाना पटोलेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:51 PM2021-11-15T18:51:36+5:302021-11-15T18:53:00+5:30

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

congress nana patole criticized bjp and rss over various issues at wardha | “BJP आणि RSS कडे इतिहासही नाही अन् भविष्यही नाही”; नाना पटोलेंचा खोचक टोला

“BJP आणि RSS कडे इतिहासही नाही अन् भविष्यही नाही”; नाना पटोलेंचा खोचक टोला

Next

वर्धा: भारतीय जनता पक्ष (BJP) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (RSS) इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. त्यामुळे ते इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच ते खोटी माहिती पसरवून स्वातंत्र्यांच्या इतिहासाचा आणि काँग्रेस नेत्यांची बदनामी करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी स्वातंत्र्याचा इतिहास आणि काँग्रेस पक्षाचा विचार गाव खेड्यापर्यंत आणि शेवटच्या माणसांपर्यंत घेऊन गेले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.    

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात १२ नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध लढत होता त्यावेळी ब्रिटिशांच्या बाजूने उभे असणारे आता लोकांना राष्ट्रवादाचे धडे देत आहेत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

सुनियोजीत कारस्थान भाजप आणि संघाकडून सुरुय

ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षापेक्षा जास्त काळ कधी तिरंगा फडकवला नाही ते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही म्हणत आहेत. सत्तेचा गैरवापर करून देशाच्या स्वातंत्र्यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा संघ आणि भाजपचा प्रयत्न सुरु आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. सातत्याने खोटे बोलून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांवर खोट्या माहितीचा भडीमार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्याचा व काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचे सुनियोजीत कारस्थान भाजप आणि संघाकडून सुरु आहे, असा मोठा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला. 

ही विचारांची लढाई अत्यंत महत्त्वाची

हा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे याचे प्रशिक्षण आपणा सर्वांना या शिबिरातून मिळाले आहे. प्रशिक्षणातून घेतलेला विचार गावखेड्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व या देशातील लोकशाही आणि हुकुमशाही वाचवण्याची लढाई लढत आहोत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी देशातील बंधुता व एकतेला नख लावणाऱ्या धर्मांध विचारांविरोधात आपली लढाई आहे. ही विचारांची लढाई अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी तुमच्यासारख्या प्रशिक्षीत कार्यकर्त्यांची गरज आहे. सेवाग्राम मध्ये झालेले हे शिबिर विचारांची शिदोरी देणारे ठरले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे प्रशिक्षण शिबिर घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
 

Web Title: congress nana patole criticized bjp and rss over various issues at wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.