सावधान, एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 02:31 PM2021-10-03T14:31:20+5:302021-10-03T14:33:05+5:30

डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत.

Beware, one click can give you millions! | सावधान, एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका!

सावधान, एक क्लिक देऊ शकतो तुम्हाला लाखोंचा फटका!

Next
ठळक मुद्देऑनलाइन व्यवहार करताना राहा सावध : सायबर गुन्हेगारांची अधिक रकमेच्या खात्यांवर पाळत

वर्धा : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे जगणेही डिजटल झाले. याच डिजिटल व्यवहाराचा गैरफायदा घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी मोठ्या रकमा असलेल्या बँक खात्यांच्या ऑनलाइन व्यवहारांना लक्ष्य करीत फसवणुकीचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे एक चुकीची क्लिकही लाखोंचा फटका देऊ शकते, त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे.

ई-तिकिटांची बुकिंग, ऑनलाइन खरेदी यासारखे व्यवहार हे नेहमीच सायबर भामट्यांचे लक्ष असते. वेगवेगळ्या पद्धतीचे ऑफर देऊन हे सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका उच्च शिक्षित नागरिकासोबतही घडला होता. ऑनलाइन व्यवहारातून थेट लाखोंची फसवणूक करण्यात आली होती. सायबर सेलच्या पोलिसांची वेळीच मदत घेतल्यास अशा फसवणुकीच्या प्रकरणांत रक्कम परत मिळण्याची शक्यताही अधिक असते. मात्र, फसवणूक होऊच नये, यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणे सर्वाधिक योग्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

फसगत झाल्यास एटीएम ब्लाॅक करा

बनावट फोन कॉल करून एटीएम व बँक खात्याची माहिती विचारून खात्यातून ऑनलाइन रक्कम परस्पर लांबविण्याचे प्रकार घडतात. अशी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, २४ तासांच्या आत एटीएम ब्लॉक करून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास सायबर सेलच्या मदतीने खातेदारास त्याची रक्कम परत मिळू शकते.

अशी करा तक्रार...

कोणाही व्यक्तीसोबत सायबर क्राइम घडल्यास त्याने प्रथम बँकेत जाऊन एटीएम ब्लॉक करावे. बँक स्टेटमेंट काढून पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, त्यानंतर तक्रारीची फोटोकॉपी, ओळखपत्र व एक फोटो दिल्यानंतर सायबर सेलच्या मदतीने तुमच्या खात्यात पैसे मिळवण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, तक्रार लवकर दाखल करावी लागते.

आरबीआयचा नियम काय सांगतो?

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जर बेकायदेशीर इलेक्ट्राॅनिक ट्रान्सॅक्शन म्हणजेच ऑनलाइन व्यवहाराअंतर्गत फसवणूक झाली असेल तर यासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीला जबाबदार धरले जात नाही. जर या फसवणुकीसंदर्भात तातडीने आपल्या बँकेला माहिती दिली तर कायदेशी पावले उचलताना फायद्याचे ठरते.

सायबर सेलकडे दाखल गुन्ह्यांवर एक नजर

सोशल मीडिया - ११

क्रेडिट कार्ड - ०८

ऑनलाइन बॅंकिंग - १४

ओटीपी फसवणूक - ०७

इतर - १८

Web Title: Beware, one click can give you millions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.