70.33 percent of the people from other districts are healthy | इतर जिल्ह्यातून आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती निरोगी

इतर जिल्ह्यातून आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती निरोगी

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठेवली जातेय पाळत

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून मुंबई, पुणे या कोरोना बाधित जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १४ हजार ९०२ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. यापैकी १० हजार ४८१ व्यक्तींमध्ये आतापर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकूणच इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेले ७०.३३ टक्के व्यक्ती सध्यास्थितीत निरोगी असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे.
इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ४ हजार २१५, देवळी तालुक्यात १ हजार ६२२, आर्वी तालुक्यात १ हजार ९७९, सेलू तालुक्यात १ हजार ६७४, आष्टी तालुक्यात १ हजार २७९, समुद्रपूर तालुक्यात ९०८, हिंगणघाट तालुक्यात २ हजार १५३ तर कारंजा (घा.) तालुक्यात १ हजार ७२ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे.
या सर्व व्यक्तींना १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने वर्धा तालुक्यातील २ हजार ७४१, देवळी तालुक्यात १ हजार ४६७, आर्वी तालुक्यात १ हजार ४९२, सेलू तालुक्यात १ हजार २४५, आष्टी तालुक्यात ९३५, समुद्रपूर तालुक्यात ८४८, हिंगणघाट तालुक्यात १ हजार २३३ तर कारंजा (घा.) तालुक्यात ५२० व्यक्तींना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सध्या एकूण ४ हजार ४२१ व्यक्ती गृहविलगिकरणात असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

५६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
गृहविलगिकरणात असलेल्या व्यक्तींपैकी ६१ व्यक्तींची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५६ व्यक्तींचा अहवाल जिल्ह्यातील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून हे व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. तर पाच व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात आलेल्या १४ हजार ९०२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारत त्याच्या घरावर सूचना फलक चिटकविण्यात आले आहे. या १४,९०२ व्यक्तींपैकी १०,४८१ व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षण नसल्याने त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

Web Title: 70.33 percent of the people from other districts are healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.