...अन् क्षणर्धात कोसळली १२५ वर्ष जुनी इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 18:18 IST2021-10-19T17:55:15+5:302021-10-19T18:18:48+5:30
१२५ वर्ष जीर्ण झालेल्या इमारतीचा भाग कोसळला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने तेथे राहणारे कुटुंबीय वेळीच बाहेर पडले आणि अनर्थ टळला.

...अन् क्षणर्धात कोसळली १२५ वर्ष जुनी इमारत
वर्धा : तब्बल १२५ वर्षांपेक्षाही जुनी झालेली जीर्ण इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळला. सुदैवाने नारे कुटुंबीय थोडक्यात बचावले. मात्र, इमारतीच्या मलब्याखाली तीन दुचाकी दबल्याने चुराडा झाला असून नुकसान झाले.
ही घटना पटेल चौका लगतच्या परिसरात मंगळवार दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास घडली. पटेल चौक परिसरात मधुसूदन राठी यांचे खताचे गोदाम आहे. ही इमारत जीर्ण झाली असून या इमारतीच्या वरील माळ्यावर विक्रम नारे, विजेंद्र नारे हे दोन भाऊ असे एकूण आठ सदस्य राहतात. ते दुपारच्या सुमारास घरी असताना इमारतीचा काही भाग कोसळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सुरक्षितस्थळी धाव घेतली. पाहता पाहता इमारतीचा संपूर्ण भाग कोसळला. यात नारे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही साहित्य मलब्याखाली दबले. इतकेच नव्हे तर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकीही मलब्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले.
घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे नितीन रायलवार, सत्यप्रकाश इंगळे यांनी पंचनामा करीत जबाब नोंदवून घेतले. जेसीबीच्या मदतीने मलबा हटविण्यात आला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, न. प. मुख्याधिकारी विजय देवळीकर यांनी भेट देत पाहणी केली.
दोन व्यक्ती दबल्याची चर्चा
इमारतीच्या बाजूला परिसरातील नागरिक लघुशंका करण्यास जात होते. दरम्यान, इमारतीचा भाग कोसळत असताना मलब्याखाली दोन व्यक्ती दबल्याची चर्चा होती. मात्र, जेसीबीच्या मदतीने मलबा काढण्यास सुरुवात झाल्यावर कुणीही मलब्याखाली दबून नसल्याचे दिसून आले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
शहरातील १०० इमारती धोकादायक
शहरात सुमारे शंभरावर इमारती जीर्ण झाल्या असून न. प.ने धोकादायक इमारतीत या सर्व इमारतींचा समावेश केलेला आहे. पालिकेकडून दरवर्षी इमारत मालकांना नोटीसही बजावण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.