Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:43 IST2025-12-17T10:40:30+5:302025-12-17T10:43:29+5:30
Uttar Pradesh Shamli Triple Murder: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने किरकोळ कारणातून आपल्याच हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत केला.

Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने किरकोळ कारणातून आपल्याच हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत केला. पत्नीने बुरखा न घालता माहेर गाठल्याने संतापलेल्या पतीने तिच्यासह पोटच्या दोन मुलींचीही हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शामली जिल्ह्यात खळबळ माजली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फारूक हा व्यवसायाने स्वयंपाकी असून तो आपल्या आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. गेल्या सहा दिवसांपासून त्याची पत्नी आणि दोन मुली बेपत्ता होत्या. फारूकचे वडील दाऊद यांनी त्यांच्याबद्दल विचारणा केली असता, फारूकने त्यांना शामली येथील एका भाड्याच्या खोलीत ठेवल्याचे सांगून टाळाटाळ केली. मात्र, मुलाच्या वागण्यातील बदल आणि संशयास्पद हालचाली पाहून वडिलांनी पोलिसांत तक्रार केली.
मध्यरात्री घडले थरारक हत्याकांड
पोलिसांनी खाक्या दाखवताच फारूकने गुन्ह्याची कबुली दिली. १० डिसेंबरच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास फारूकने पत्नी ताहिराची गोळी झाडून हत्या केली. हा आवाज ऐकून मोठी मुलगी आफरीन जागी झाली आणि तिथे धावत आली. पाठोपाठ दुसरी मुलगी सहरीनही तिथे पोहोचली. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून फारूकने दोन्ही मुलींचा गळा आवळून त्यांनाही संपवले.
शौचालयाच्या खड्ड्यात मृतदेह पुरले
हत्येच्या कृत्यानंतर फारूकने घराच्या अंगणात शौचालयासाठी खोदलेल्या ९ फूट खोल खड्ड्यात तिन्ही मृतदेह पुरून टाकले आणि वरून माती टाकली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी मंगळवारी हा खड्डा खोदून तिन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
हत्येमागचे धक्कादायक कारण
आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी अनेकदा त्याच्याशी भांडण करायची. शिवाय, एका महिन्यापूर्वी पत्नी ताहिरा बुरखा न घालता तिच्या माहेरी गेली होती, ज्यामुळे समाजात आपली मान खाली गेल्याची भावना फारूकच्या मनात होती. याच रागातून त्याने हे क्रूर कृत्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.